मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे ट्रेलर उलटला, तीन तास ठप्प झाली होती वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:11 IST2025-11-27T17:10:54+5:302025-11-27T17:11:39+5:30
सुमारे तीन तासानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे ट्रेलर उलटला, तीन तास ठप्प झाली होती वाहतूक
रत्नागिरी : मुंबई-गाेवा महामार्गावरील हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे ट्रेलर उलटल्याची घटना बुधवारी (२६ नाेव्हेंबर) सकाळी १० वाजता घडली. हातखंबा येथील देसाई हायस्कूलसमाेरील चढावात हा ट्रेलर उलटल्याने तीन तास वाहतूक बंद हाेती. सुदैवाने या अपघातात काेणतीही जीवितहानी झालेली नसून दुपारी १ वाजता अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
ट्रेलर चालक दशरथ मुनिराज बिंद (वय ४९, रा. मानखुर्द - शिवाजीनगर, मुंबई) हा बुधवारी सकाळी ट्रेलरवर (एमएच- ४३, बीपी- ४६४६) आयसो टँक लोड करून गोवा फॅक्टरी येथून उरण (जि. रायगड) येथील न्हावाशेवा पोर्ट येथे जात होता. सकाळी १० वाजण्याच्या सुमाराला तो हातखंबा येथील देसाई हायस्कूलसमोरील चढावात आला असता ओव्हरलोड केमिकलमुळे ट्रेलर चढावात मागे आला आणि उलटून अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रेलरचे व आयसो टँकचे नुकसान झालेले आहे. याबाबत ट्रेलर चालक दशरथ बिंद याने रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात माहिती दिली.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रेलर आणि आयसो टँक बाजूला करून महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नाेंद ग्रामीण पाेलिस स्थानकात करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हवालदार रूपेश भिसे करत आहेत.
यंत्रणा धावली
अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आणि अग्निशमन दल, उपप्रादेशिक परिवहन महामंडळाचे अधिकारी राजश्री पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.