रस्ता फोडल्याने वाहतूक बंद

By Admin | Updated: July 2, 2016 23:43 IST2016-07-02T23:43:41+5:302016-07-02T23:43:41+5:30

खेड नगर परिषद : पाच-सहा दिवसात काम होणार पूर्ण

Traffic off the road | रस्ता फोडल्याने वाहतूक बंद

रस्ता फोडल्याने वाहतूक बंद

खेड : नगर परिषद हद्दीतील जगबुडी नदीकिनाऱ्यालगत असलेला वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. खेड नगरपालिकेने हा रस्ता फोडला असून, शहरांतर्गत असलेला हा महत्वाचा रस्ता मध्यभागी तुटल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. नगर परिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याशी संपर्क साधला असता, ५ ते ६ दिवसांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे तर काँग्रेसचे गौस खतिब यांनी मात्र तातडीने रस्ता पूर्ववत न झाल्यास आंदोलन करू, असा गर्भित इशाराच दिला आहे़
मुख्याधिकारी रोडगे यांच्या म्हणण्यानुसार, बोरज धरणातून खेडवासीयांना पिण्याची पाईपलाईन याच रस्त्याच्यामधून आली आहे. या लाईनचा एक पाईप खराब व निकृष्ट झाल्याने तो बदलण्यासाठी हा रस्ता फोडावा लागला आहे. रस्त्याचे दोन भाग झाले आहेत. मात्र, येत्या ५ ते ६ दिवसांमध्ये हा रस्ता पूर्ववत करणार असल्याचे सांगत नागरिकांची गैरसोय होऊ देणार नसल्याचे सांगितले.
गेल्या १० दिवसांपूर्वी हा रस्ता फोडण्यात आला आहे. नगर परिषदेने हा रस्ता का फोडला? यामागचे कारण कोणालाही माहीत नव्हते. या रस्त्यावरील वाहतूक आणि रहदारी बंद झाली आहे. ब्रिटिशकालीन खेड बंदर म्हणून खेडची जुनी ओळख आहे. याच ठिकाणी हे बंदर अस्तित्वात होते. आजही खेडची ओळख खेड बंदरामुळे झाल्याचे अनेक नागरिक सांगतात.
जगबुडी नदीकिनारी असलेले हे बंदर सर्वप्रकारे हिताचे आहे. बंदर असल्याने तत्कालीन सरकारने या ठिकाणी रस्ता तयार केला होता. त्याचे अनेकवेळा डांबरीकरणही करण्यात आले. आजही हा रस्ता शहरांतर्गत वाहतुकीसाठी महत्वपूर्ण मानला जात आहे. उन्हाळयात या ठिकाणाहून पलिकडील भोस्ते गावात जाता येते. त्यामुळे या रस्त्याचा वापर होतो. शिवाय या परिसरात मुस्लिमवस्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि येथूनच शहरातील विविध भागात जाणे-येणे शक्य होत असल्याने या मार्गाचा मोठ्या प्रमाणात रहदारीसाठी वापर होत आहे. (प्रतिनिधी)
वाहनांची वर्दळ थंडावली
साठे मोहल्ला, पोत्रिक मोहल्ला, तांबे मोहल्ला येथील अंतर्गत वाहतूक याच मार्गावरून सुरू असते. आता हा मार्गच बंद झाल्याने नागरिक आणि वाहनांची वर्दळ पूर्णपणे थंडावली आहे. ही वाहतूक आता अनिश्चित काळासाठी बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

Web Title: Traffic off the road