ओबीसी आरक्षणासाठी गुहागरात तेली समाजाचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:33+5:302021-07-03T04:20:33+5:30

आबलोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कोकण विभाग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका ...

Movement of oil community in Guhagar for OBC reservation | ओबीसी आरक्षणासाठी गुहागरात तेली समाजाचे आंदाेलन

ओबीसी आरक्षणासाठी गुहागरात तेली समाजाचे आंदाेलन

आबलोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कोकण विभाग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका तेली समाज सेवा संघातर्फे ओबीसींच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदाेलन करण्यात आले. यावेळी गुहागरच्या तहसीलदार लता धाेत्रे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

ओबीसी आरक्षण, जात निहाय जनगणना आदी प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील विविध भागांतून कोरोना नियमांचे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत तेली समाज एकवटला होता. यावेळी प्रसिद्धी प्रमुख अमोल पवार यांनी उपस्थित समुदायाला आंदोलनामागची भूमिका सांगितली. अध्यक्ष शशिकांत पवार यांनी आंदोलनाची गरज आणि पुढील पिढीसाठी असणारे महत्त्व विशद केले. कोकण प्रांत सचिव चंद्रकांत झगडे यांनी आगामी काळातील आंदोलनाची दिशा याविषयी मार्गदर्शन केले.

सर्वोच्च न्यायालयात अपील करुन होऊ घातलेल्या पोटनिवडणुका रद्द कराव्यात. राज्य व केंद्र शासनाने मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात. केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी व ओबीसींच्या संख्येच्या प्रमाणात, टक्केवारीनुसार त्यांना प्रत्येक क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे. राज्य व केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेनुसार ओबीसी आरक्षणाचा कायदा करावा या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. सदर मागण्यांची त्वरित अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातून ओबीसी समाज रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागीय सचिव चंद्रकांत झगडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल पवार, तालुका अध्यक्ष शशिकांत पवार, उपाध्यक्ष अनिल रहाटे, महिला आघाडी अध्यक्षा दिव्या किर्वे, युवक अध्यक्ष प्रीतम रहाटे, एकनाथ रहाटे, प्रकाश झगडे, प्रदीप पवार, विश्वनाथ रहाटे, नितीन खानविलकर, हरिश्चंद्र रहाटे, विनोद महाडिक, गणेश किर्वे, राजेश महाडिक यासह तालुक्यातील तेली समाज बांधव उपस्थित होते. प्रदीप पवार यांनी आभार मानले.

--------------------------

ओबीसी आरक्षणासाठी गुहागर तेली समाजातर्फे गुरूवारी तहसील कार्यालयाबाहेर आंदाेलन करण्यात आले.

Web Title: Movement of oil community in Guhagar for OBC reservation