आंगवलीतील बेपत्ता प्राैढ सापडला मृतावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST2021-07-27T04:33:31+5:302021-07-27T04:33:31+5:30

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडी येथील बेपत्ता झालेल्या प्राैढाचा मृतदेह साेमवारी आंगवलीतील मठाचा माळ येथील जुव या पऱ्याच्या ...

The missing Praidh was found dead in Angwali | आंगवलीतील बेपत्ता प्राैढ सापडला मृतावस्थेत

आंगवलीतील बेपत्ता प्राैढ सापडला मृतावस्थेत

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडी येथील बेपत्ता झालेल्या प्राैढाचा मृतदेह साेमवारी आंगवलीतील मठाचा माळ येथील जुव या पऱ्याच्या पात्रात आढळला. या तरुणाचे नाव दिलीप शिवराम लाखण असे आहे.

देवरूख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप लाखण बेपत्ता झाल्याची फिर्याद २३ जुलै राेजी त्यांची पत्नी सुवर्णा लाखण यांनी दिली हाेती. दिलीप लाखण, पत्नी सुवर्णा लाखण व त्याची मुलगी हे तिघे जण २२ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता आंगवली येथे रेशन नेण्यासाठी रास्त धान्य दुकानावर आले होते. आंगवली बौद्धवाडी येथे प्रेत झाल्याने धान्य घेऊन झाल्यानंतर दिलीप लाखण हे आंगवली बौद्धवाडीकडे प्रेताला जातो, असे सांगून गेले होते; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने सर्वत्र शोधाशोध, चौकशी करण्यात आली. तरीही त्यांचा थांगपत्ता न लागल्याने बेपत्ता असल्याची फिर्याद सुवर्णा लाखण यांनी शुक्रवारी दुपारी देवरूख पोलीस स्थानकात दिली होती.

लाखण कुटुंबीय सोमवारी त्यांचा शोध घेत असतानाच सकाळी आंगवली मठाचा माळ जुव या ठिकाणी गाव पऱ्याच्या पात्रात दिलीप लाखण हे मृतावस्थेत दिसले. याची माहिती देवरुख पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला; मात्र त्याचा मृत्यू कसा झाला, हे कळू शकलेले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश जाधव करीत आहेत.

Web Title: The missing Praidh was found dead in Angwali