चिपळूणच्या वाढीव उड्डाणपुलासाठी मंत्र्यांना साकडे, महायुतीच्या शिष्टमंडळाची आग्रही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:28 IST2025-07-30T16:27:28+5:302025-07-30T16:28:46+5:30

मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कापसाळपर्यंत होण्यासाठी हे शिष्टमंडळ पाठपुरावा करत आहे

Mahayuti delegation urges Minister Shivendraraje Bhosale for increased flyover at Chiplun | चिपळूणच्या वाढीव उड्डाणपुलासाठी मंत्र्यांना साकडे, महायुतीच्या शिष्टमंडळाची आग्रही मागणी

चिपळूणच्या वाढीव उड्डाणपुलासाठी मंत्र्यांना साकडे, महायुतीच्या शिष्टमंडळाची आग्रही मागणी

चिपळूण : शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कापसाळपर्यंत वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम व महायुती शिष्टमंडळाची मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत कापसाळपर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या. तसेच चिपळुणात भेट देऊन महामार्गाची पाहणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कापसाळपर्यंत होण्यासाठी हे शिष्टमंडळ पाठपुरावा करत आहे. आमदार निकम यांच्या पुढाकारामुळे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मंत्रालयातील दालनात सोमवारी शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीत कापसाळपर्यंत उड्डाणपुलाची आवश्यकता सविस्तरपणे मांडण्यात आली.

त्यावर मंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ वाढीव उड्डाणपुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय मुख्य अभियंत्यांनाही येथे पाहणी करण्याची सूचना केली. येत्या काही दिवसांत चिपळूणला भेट देत स्वतः महामार्गाची पाहणी करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

महामार्गावर सातत्याने होणारे अपघात, नागरिकांचे हाल, सामाजिक प्रश्न, ज्येष्ठांना व विद्यार्थ्यांना भयमुक्त करण्यासाठी आवश्यक ठिकाणी गतिरोधक, पाग नाका येथे सिग्नल व्यवस्था, कायमस्वरुपी पोलिस बंदोबस्त, पागनाका येथे फ्लाय फूट ब्रीज करण्याची मागणी केली. सदरची कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता शेलार यांना सदरची कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. वाढीव उड्डाणपुलाचे अंदाजपत्रक केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. त्याच्या मंजुरीसाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

या बैठकीला शिंदेसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, किशोर रेडीज, महायुती समन्वयक उदय ओतारी, दीपा देवळेकर, निहार कोवळे, सुयोग चव्हाण, विनोद पिल्ले, निनाद आवटे, अमित चिपळूणकर, विनायक वरवडेकर, कुणाल आंबेकर उपस्थित होते.

Web Title: Mahayuti delegation urges Minister Shivendraraje Bhosale for increased flyover at Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.