Ratnagiri: मुर्तवडेतील पोस्टात अपहार, पोस्टमास्तरवर गुन्हा दाखल; खातेदारांमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:07 IST2025-10-08T16:06:34+5:302025-10-08T16:07:43+5:30
खाती न उघडता बोगस पासबुक तयार करून अपहार केला

Ratnagiri: मुर्तवडेतील पोस्टात अपहार, पोस्टमास्तरवर गुन्हा दाखल; खातेदारांमध्ये खळबळ
चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे येथील पोस्टात २ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी पोस्टमास्तर ज्ञानेश्वर यशवंत रहाटे (रा. मुर्तवडे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत डाकघर निरीक्षक हिमांशू जोशी यांनी सावर्डे पोलिस स्थानकात तक्रार दिली. ही घटना १८ डिसेंबर २०१७ ते ७ नोव्हेंबर २०१८ तसेच २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुर्तवडे येथील पोस्टात घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर रहाटे हा मुर्तवडे शाखा डाकघर येथे पोस्टमास्तर म्हणून कार्यरत होता.
यावेळी पोस्टाचे खातेदार रामचंद्र महादेव मांडवकर व वासंती रामचंद्र मांडवकर (दोघेही रा. मुर्तवडे) यांची पाच वर्षे मुदतीची खाती न उघडता बोगस पासबुक तयार करून दोन लाख रुपये रकमेचा अपहार केला आहे.
ही बाब पोस्ट खात्याच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधिताने २ लाखाची ठेव व त्यावर मिळणारे व्याज असे एकूण ३ लाख रुपये डाक विभागाकडे भरणा केले. मात्र खातेदारांची खाती न उघडता दोन लाखांच्या फसवणूक प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.