कोरेगाव आरोग्य केंद्राचा भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST2021-07-18T04:22:49+5:302021-07-18T04:22:49+5:30

खेड : तालुक्यातील खाडीपट्ट्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णांची ...

The burden of Koregaon Health Center is on a single medical officer | कोरेगाव आरोग्य केंद्राचा भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर

कोरेगाव आरोग्य केंद्राचा भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर

खेड : तालुक्यातील खाडीपट्ट्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्तच आहे.

खाडीपट्ट्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव असून, यापूर्वी याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र, डॉ. भानुदास गिरी हे सहा महिन्यांपूर्वी पदव्युत्तर शिक्षणासाठी गेल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर या आरोग्य केंद्राचा डोलारा सांभाळण्याची वेळ आली आहे. यामुळे आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तासनतास तिष्ठत बसावे लागते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश, विंचूदंश झालेल्या रुग्णांसह अन्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णांची ससेहोलपट होत आहे.

खाडीपट्ट्यात कोरोनाचा फैलावही दिवसागणिक वाढत आहे. कोरेगावातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, हे गाव कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त जागा भरण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: The burden of Koregaon Health Center is on a single medical officer