बीएसएनएल अधिकारी-कर्मचारी महासंघाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST2021-07-18T04:22:35+5:302021-07-18T04:22:35+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी भारत संचार निगम लिमिटेडचे अधिकारी व कर्मचारी महासंघाने विविध मागण्यांकरिता भारतभर मंगळवारी तीव्र आंदोलन केले. ...

BSNL Officers-Employees Federation Movement | बीएसएनएल अधिकारी-कर्मचारी महासंघाचे आंदोलन

बीएसएनएल अधिकारी-कर्मचारी महासंघाचे आंदोलन

रत्नागिरी : रत्नागिरी भारत संचार निगम लिमिटेडचे अधिकारी व कर्मचारी महासंघाने विविध मागण्यांकरिता भारतभर मंगळवारी तीव्र आंदोलन केले. यात रत्नागिरीतील बीएसएनएलचे सर्व अधिकारी, कर्मचारी आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते. दूरसंचार विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदविला.

बीएसएनएलची खालावलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली पाहिजे, कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन मिळत नाही, ते पुन्हा सुरळीत झाले पाहिजे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची हेळसांड थांबली पाहिजे. बीएसएनएल फोर जी यंत्रणा तातडीने सुरू करून, बेसिक फोन सेवा, इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा यांना पूर्ण संरक्षण मिळाले पाहिजे, तिसरा वेतन समीक्षा अहवाल लागू झाला पाहिजे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

नवी दिल्ली इथे ज्येष्ठ नेते जी. एल. जोगी, सबिस्तीन, कोळपकर आदींनी नेतृत्व केले, तर राज्य पातळीवर संचार निगम अधिकारी महासंघाचे महादेवराव अडसूळ, कोतंबे, दाणी, नलावडे आदींनी नेतृत्व केले.

सध्या बीएसएनएल वाईट संक्रमणामधून जात आहे. दोन वर्षे असलेले लॉकडाऊन, सरकारचे असलेले दुर्लक्ष, बीएसएनएलला मिळणारी सापत्न वागणूक, फोरजी सेवेला होणारा विलंब, अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता, ठेकेदारी पद्धतीने होणारे निकृष्ट काम आदीबाबत प्रशासनास वेळोवेळी सांगूनही होणारे दुर्लक्ष, याचा दूरसंचार सेवेवर होणारा विपरीत परिणाम याकडे सरकारचे लक्ष वेधणे, हा प्रमुख उद्देश आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना तीन महिने वेतन नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून योग्य ते धोरण अवलंबिले पाहिजे म्हणून हे आंदोलन आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष केले, तर २८ तारखेला पुन्हा लाक्षणिक उपोषण केले जाईल, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा सचिव नंदकिशोर कदम यांनी दिली. या आंदोलनास राज्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे कदम यांनी सांगितले.

फोटो मजकूर

भारत संचार निगम लिमिटेडचे अधिकारी व कर्मचारी महासंघाने विविध मागण्यांकरिता रत्नागिरी येथील कार्यालयासमोर मंगळवारी तीव्र आंदोलन केले.

Web Title: BSNL Officers-Employees Federation Movement