Ratnagiri: साखरपुड्याच्या दिवशी घरातून निघून गेला; लग्नाच्या दिवशी मृतदेह दरीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:35 IST2025-06-05T12:32:29+5:302025-06-05T12:35:10+5:30

अणुस्कुरा घाटात कार चारशे फूट दरीत कोसळली, अपघाती मृत्यूचे गूढ

A young man from Lanja, who left home on his engagement day died in an accident at Anuskura Ghat | Ratnagiri: साखरपुड्याच्या दिवशी घरातून निघून गेला; लग्नाच्या दिवशी मृतदेह दरीत सापडला

Ratnagiri: साखरपुड्याच्या दिवशी घरातून निघून गेला; लग्नाच्या दिवशी मृतदेह दरीत सापडला

राजापूर : साखरपुड्याच्या दिवशीच घरातून निघून गेलेल्या लांजा येथील तरुणाच्या गाडीचा अणुस्कुरा घाटात अपघात झाला असून, त्यात तो तरुण जागीच ठार झाला आहे. त्याची कार घाटातून ४०० फूट खोल दरीत कोसळली आहे. कौस्तुभ विजय कुरूप (३०, लांजा), असे त्याचे नाव आहे. ३ जूनला त्याचा साखरपुडा होणार होता आणि बुधवार, ४ जून रोजी वैदिक परंपरेनुसार त्याचे लग्न होणार होते. मात्र, त्याआधीच त्याचा अपघातीमृत्यू झाल्याने गूढ निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे घाटमार्गे प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला रस्त्यावर गाडीचे इंजिन पडलेले दिसले. ती माहिती त्याने अणुस्कुरा तपासणी नाक्यावरील पोलिसांना दिली. त्याआधारे तपासणी नाक्यावरील पोलिसांनी घाटात जाऊन पाहणी केली असता एक गाडी दरीत कोसळली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने ही माहिती राजापूर पोलिसांना देण्यात आली. राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव, लांजाचे पोलिस निरीक्षक नीलकंठ बगळे आपल्या कर्मचाऱ्यांसह अणुस्कुरा घाटात दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थही अपघाताचे वृत्त समजताच धावून आले.

अपघातग्रस्त गाडीची पुरती चाळण झाली होती आणि त्याच्या बाजूलाच एक तरुण पडला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अधिक माहितीमध्ये तो लांजातील कौस्तुभ कुरूप असल्याचे पुढे आले. तो कामानिमित्त कोल्हापूरला गेला होता. मंगळवारी ३ जूनला तो लांजाकडे परत येत असताना अणुस्कुरा घाटात हा अपघात झाला असावा आणि घाटातील धुक्यामुळे हा अपघात कोणाच्याही लक्षात आला नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

कौस्तुभ बेपत्ता झाल्याची पत्नीची तक्रार

दरम्यान, कौस्तुभ बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी प्राजक्ता यांनी मंगळवारी संध्याकाळी लांजा पोलिस स्थानकात नोंदवली आहे.

नोंदणीविवाहानंतर होणार होते विधीपरंपरेनुसार लग्न

कौस्तुभ आणि प्राजक्ता यांचे ५ मे २०२५ रोजी रजिस्टर लग्न झाले आहे. मात्र, कौस्तुभच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. यामुळे विधीपरंपरेनुसार मंगळवार, ३ रोजी ते दोघे साखरपुडा करणार होते आणि बुधवार ४ रोजी विवाह करणार होते.

मध्यरात्रीनंतर कोणालाही न सांगता बाहेर पडला

मात्र, सोमवारी मध्यरात्रीनंतर कौस्तुभ घरात कोणालाही न सांगता कार घेऊन बाहेर निघून गेला. मंगळवारी साखरपुडा असल्याने प्राजक्ता त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, संपर्क न झाल्यामुळे अखेर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता लांजा पोलिस स्थानकात कौस्तुभ बेपत्ता झाल्याची तक्रार लांजा पोलिसांकडे नोंदवली आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरित

साखरपुड्याच्या दिवशी कौस्तुभ कोणालाही न सांगता घराबाहेर निघून का गेला, अपघात नेमका कधी झाला, अपघातग्रस्त गाडीचे इंजिन रस्त्यावरच कसे पडले होते, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अपघात कसा आणि कधी झाला, याबाबतही गूढ असून, पोलिस तपासात या गोष्टी उघड होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: A young man from Lanja, who left home on his engagement day died in an accident at Anuskura Ghat