जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:27 IST2025-10-14T19:25:17+5:302025-10-14T19:27:16+5:30
Rajasthan Jaisalmer Bus Catches Fire: राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी धावत्या बसला अचानक आग लागल्याने एकच खळबळ माजली.

जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एक मोठा अपघात घडला. जैसलमेरहून जोधपूरकडे जाणाऱ्या एका खासगी बसला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत तीन लहान मुले आणि चार महिलांसह किमान १० ते १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
जैसलमेरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या थैयत गावाजवळ दुपारी ३:३० वाजता ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ५७ प्रवाशांसह ही बस दुपारी ३ वाजता जैसलमेरहून निघाली. परंतु, बसने थैयत गाव ओलांडताच बसच्या मागच्या बाजूने धूर निघू लागला. काही क्षणातच संपूर्ण बसला आग लागली. बसमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. अनेक प्रवाशांनी खिडक्या आणि दरवाजे तोडून स्वतःला वाचवण्यासाठी बाहेर उड्या मारल्या. गावकऱ्यांनी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्वरित बचावकार्याला सुरुवात केली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
#WATCH | Rajasthan: A Jaisalmer-Jodhpur bus burst into flames in Jaisalmer. Fire tenders and Police present at the spot. pic.twitter.com/8vcxx5ID1q
— ANI (@ANI) October 14, 2025
नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी पृथ्वीपाल सिंह राठोड यांनी सांगितले की, " या आगीत १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने तीन रुग्णवाहिकांमधून जैसलमेर येथील जवाहर रुग्णालयात नेण्यात आले. गंभीररित्या भाजलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी जोधपूर येथे हलवण्यात आले.
आगीचे कारण अस्पष्ट
अधिकाऱ्यांच्या मते, बसला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिन जास्त गरम होणे यामुळे आग लागल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.