Wildlife, birds along the roads in the Karnala area | कर्नाळा परिसरातील रस्त्यालगत अवतरले वन्यप्राणी, पक्षी

कर्नाळा परिसरातील रस्त्यालगत अवतरले वन्यप्राणी, पक्षी

अरुणकुमार मेहत्रे।

कळंबोली : २४ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील कर्नाळा अभयारण्यही त्यात लॉकडाऊन झाले आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत कर्नाळा अभयारण्य परिसरात जंगलातील बिबट्या, हरीण, फुलपाखरू, फालकन पक्षी, कर्नाळा किल्ला, वाघ या प्रण्यांचे थ्रीडी चित्र रेखाटण्यात आल्याने पर्यटकांना लॉकडाऊननंतर पाहण्यासाठी एक पर्वणी ठरणार आहे.यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावरून न जाता अभयारण्यातून गेल्याचा भास होणार आहे. त्याचबरोबर सेल्फी पॉइंट विकसित करण्यात आला आहे.

पनवेल शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा अभयारण्य आहे. या अभयारण्यात विविध प्रकारच्या वृक्षवेलींबरोबर प्राणी व पक्ष्यांचे वास्तव्य आहे.
लॉकडाऊनचा फायदा घेत वनक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांच्या संकल्पनेतून थ्रीडी चित्र रेखाटण्यात आले आहे. अभयारण्य परिसरात अगोदर ११ मीटर रुंदीचा रस्ता होता. रुंदीकरणाने तो आता ३० मीटर रुंदीचा झाला आहे. त्यामुळे अभयारण्य प्रवेशद्वारापासून महामार्ग उंचावला गेला आहे. अभयारण्य परिसरातील वळणावरून वाहने खाली जाऊ नयेत म्हणून १४ फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या संरक्षक भिंतीचा उपयोग करून या भिंतीवरच चित्रकार रवी साटम आणि त्यांच्या ४ सहकाऱ्यांनी गेल्या दीड महिन्यापासून ही चित्रे साकारली आहेत. बिबट्या, हरीण, वाघ, स्वर्गीय नर्तक, फालकन पक्षी, कर्नाळा किल्ला, वाघ, फुलपाखरू, माकड, मोर, विविध झाडे, वृक्षवेली, लहान मुले, प्राणी आणि पक्ष्यांची थ्रीडी चित्रे साकारण्यात आली आहेत.
त्याचबरोबर वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात घालू नका. जर तुम्ही निसर्गावर प्रेम केले तर आपल्याला निसर्गाचे सर्वच सौंदर्य पाहायला मिळेल. जर झाडांनी आॅक्सिजनऐवजी वायफाय दिला असता तरङ्घप्रत्येकाने एक तरी झाड लावले असते, अशी चित्रांसह सुविचारांची पेरणी केली आहे.

६ लाख खर्च
थ्रीडी चित्रे तसेच इतर कामासाठी ६ लाख खर्च करण्यात आला आहे. बाहेरील भिंतीवरील चित्रांकरिता अडीच लाख खर्च करण्यात आला आहे. या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरलेला कलर पाण्यात धुतला जात नाही. त्यामुळे पावसातील पाणी व उन्हाळ्यातील तापमानात चित्रातील कलर उडणार नाही.

प्रवेशद्वारापासून ते अभयारण्यात जाणाºया मार्गावर काय काय पाहाल, कुठल्या स्थानावरून कोणते प्राणी व पक्षी दिसतील याची माहिती, किल्ला, प्राणी व पक्षी यांची माहिती, रोपट्यापासून झाडांची निर्मिती कशी होते याविषयी १८ फलक लावण्यात आले आहेत.

Web Title: Wildlife, birds along the roads in the Karnala area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.