कोकणात महायुतीचं वर्चस्व रोखण्यासाठी ठाकरेंची रणनीती; पराभवानंतर जुन्या शिवसैनिकांना मैदानात उतरवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 16:23 IST2026-05-10T16:23:55+5:302026-05-10T16:23:55+5:30
स्थानिक निवडणुकीतील पिछाडीनंतर उद्धव ठाकरेंकडून पनवेलमध्ये खांदेपालट

कोकणात महायुतीचं वर्चस्व रोखण्यासाठी ठाकरेंची रणनीती; पराभवानंतर जुन्या शिवसैनिकांना मैदानात उतरवले
पनवेल: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. कोकण पट्ट्यात महायुतीने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पनवेल परिसरात पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत अखेर भाकरी फिरवली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पनवेलमध्ये पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी नव्या दमाच्या आणि निष्ठावान शिलेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपक निकम यांच्याकडे सूत्रे
या फेरबदलात सर्वात महत्त्वाची नियुक्ती म्हणजे ज्येष्ठ शिवसैनिक दीपक निकम यांची. त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १९८० पासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या निकम यांनी दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. नवी मुंबई आणि रायगड परिसरात पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी गणेश नाईक यांच्यासोबतही काम केले आहे. राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी पक्षांतर केले असतानाही निकम यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. प्रदीर्घ अनुभवाचा आणि निष्ठेचा फायदा पक्षाला आगामी काळात होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नव्या नियुक्त्यांचा धडाका
केवळ जिल्हाप्रमुखच नव्हे, तर महानगर आणि तालुका पातळीवरही पक्षाने खांदेपालट केला आहे. अॅड. समाधान काशीद यांच्याकडे महानगरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रामदास पाटील आणि भरत पाटील यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करून ग्रामीण भागात पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
या सर्व नियुक्त्या शिवसेना नेते अनंत गीते, माजी आमदार बाळ माने, उपनेते बबन पाटील, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या असून शुक्रवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
पनवेल महानगरपालिकेवर विशेष लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जरी ग्रामीण भागात यश हुकले असले, तरी पनवेल महानगरपालिकेत मात्र शिवसेनेची 'मशाल' धगधगती राहिली आहे. महानगरपालिकेत पक्षाचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. अनेक प्रभागांत पराभूत झालेल्या उमेदवारांनीही ४ ते ५ हजारांच्या दरम्यान मते घेतल्याने पक्षाची पकड सिद्ध झाले आहे.