खराब रस्त्यांमुळे एसटी वाहतूक कोलमडली

By Admin | Updated: August 26, 2015 00:09 IST2015-08-26T00:09:58+5:302015-08-26T00:09:58+5:30

महाड व पोलादपूर तालुक्यांतील ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यांवर एसटी

ST traffic collapses due to bad roads | खराब रस्त्यांमुळे एसटी वाहतूक कोलमडली

खराब रस्त्यांमुळे एसटी वाहतूक कोलमडली

महाड : महाड व पोलादपूर तालुक्यांतील ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यांवर एसटी गाड्या चालविणे महामंडळाला अवघड झाले असून कमी प्रवासी आणि खराब रस्त्यामुळे गाड्यांचे होणारे नुकसान अशा स्थितीत महाड आगाराला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
दोन्ही तालुक्यांच्या दुर्गम भागात बहुतांश ठिकाणी मिनीडोर वा सहा आसनी रिक्षासारख्या वाहनांचे जाळे पसरलेले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक देखील हैराण होत आहेत. रस्त्यांच्या अशा अवस्थेमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना अनेकवेळा वाहनेच गावात येत नसल्यामुळे पायपीट करण्याशिवाय पर्यायच राहत नसल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतींनी दिले असले तरी या देखभालीसाठी गेली चार वर्षे निधीच आलेला नसल्याची बाब पुढे आली आहे.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे महाड पोलादपूर तालुक्यातील एसटीच्या अनेक फेऱ्या बंद करण्याची नामुष्की महाड आगारावर आली आहे. रस्त्यांच्या दुरुस्ती करण्याबाबत वाहतूक नियंत्रकाकडून जिल्हा परिषदेकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. महाड, पोलादपूर तालुक्यांत अनेक दुर्गम गावे असून एसटी गाड्या गावात येत नसल्याने ग्रामस्थांना मोठा फटका बसत आहे. (वार्ताहर)

 

Web Title: ST traffic collapses due to bad roads