महाविकास आघाडीला रायगडमध्ये धक्का?; नवी राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 11:04 PM2020-02-22T23:04:52+5:302020-02-23T06:49:02+5:30

राजकीय धुसफूस; शेकाप, काँग्रेसच्या शाब्दिक हल्ल्याने राष्ट्रवादी काँग्रेस घायाळ

rift in maha vikas aghadi in raigad new political equation likely to happen | महाविकास आघाडीला रायगडमध्ये धक्का?; नवी राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता

महाविकास आघाडीला रायगडमध्ये धक्का?; नवी राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता

Next

- आविष्कार देसाई 

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील खासदार सुनील तटकरे हे महाआघाडीतील घटक पक्षांना विश्वासात घेत नसल्याची तसेच फसवणूक करत असल्याबाबतची ओरड शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांनी सुरू केली आहे. त्यामुळे महाआघाडीत महाबिघाडी निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे नव्याने होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नवीन राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी आघाडीच्या माध्यमातून लढल्या होत्या. निवडणुकीत सर्वाधिक फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच झाला आहे. त्यामुळे मदत करूनही ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’ अशी गत शेकाप आणि काँग्रेसची झाली आहे. शेकापसह काँग्रेसने केलेल्या राजकीय हल्ल्याला सुनील तटकरे यांनी अद्याप प्रतिउत्तर दिलेले नाही. त्यामुळे तटकरे याबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये खासदार सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचेच प्रभुत्व राहिले आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असणारे दोघेही नेते गेल्या सहा वर्षांपासून राजकीय विचाराने प्रेरित होऊन एकत्र आले होते. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका त्यांनी एकत्र लढल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही पक्षांना कमी-अधिक प्रमाणात यशही आले आहे.

सध्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. शेकापकडे २१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ सदस्य आहेत. असे असतानाही जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले होते. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीतही सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी शेकापसह काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळल्याचे जाहीर सभांमधून वेळोवेळी सांगण्यात आले आहे.

महाआघाडीमध्ये महाबिघाडी होत असल्याची पहिली ठिणगी दस्तुरखुद्द आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग-झिराड येथील एका कार्यक्रमात पडली होती. सुनील तटकरे यांनी नेहमीप्रमाणे दगाफटका केला, असा थेट हल्ला चढवून सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. महाआघाडीच्या माध्यमातून लढलो नसतो तर विधानसभा निवडणुकीतील निकाल वेगळे लागले असते. आघाडीमुळेच आमचा पराभव झाला, असे जाहीर बोलून पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काहीच दिवसांनी माणिक जगताप यांनी लगावलेल्या राजकीय टोल्यामुळे महाआघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अद्याप कोणताच खुलासा केलेला नाही.

नवीन समीकरणे जुळण्याची शक्यता
महाआघाडीतील धुसफूस समोर आल्याने याचे राजकीय परिणाम काही महिन्यांनी होणाºया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमधील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी निवडणुकीपूर्वी संपण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे नव्याने होणाºया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वेगळी समीकरणे जुळण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.

आघाडीतील मित्रपक्षांची कामे होणार नसतील, तर आघाडीच्या धर्माचे पालन करायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गरजेपुरते आम्ही पाहिजेत आणि गरज नसेल तेव्हा आम्हाला दूर करायचे, असेही खडेबोल जगताप यांनी सुनावले होते.

डावलल्याची खंत
विधानसभेच्या निवडणुकीतही आघाडीचा धर्म पाळण्यात आला. त्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला. या निवडणुकीत शेकापसह काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. शिवसेना आणि भाजप यांना तीन जागा मिळाल्या होत्या.

निवडणुका झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह अन्य मित्रपक्षांची राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्या वेळी सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन काम करण्यात येईल, असा ढिंडोेरा सुनील तटकरे यांनी पिटला होता, अशी खदखद दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसचे माणिक जगताप यांनी बोलून दाखवली होती. 

आधी दररोज फोन करणारे तटकरे आता आमचे फोनसुद्धा उचलत नाहीत आणि फोनला रिप्लायही देत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: rift in maha vikas aghadi in raigad new political equation likely to happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.