निवडणुकीच्या धामधुमीत बाजारपेठांत उलाढाल मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:25 PM2019-10-18T23:25:09+5:302019-10-18T23:25:17+5:30

बाजारात शुकशुकाट : पावसामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांना फटका

Markets fluctuate in the throes of elections | निवडणुकीच्या धामधुमीत बाजारपेठांत उलाढाल मंदावली

निवडणुकीच्या धामधुमीत बाजारपेठांत उलाढाल मंदावली

Next

पाली : महाराष्ट्रात सध्या निवडणूक असल्यामुळे सर्वत्र प्रचार आणि रॅली यांचेच वातावरण दिसत आहे. सुधागड तालुक्यातही सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. दिवाळी आता फक्त १० ते १५ दिवसांवर येऊन ठेपली असली तरी बाजारात होत असलेली धावपळ आणि उलाढाल मात्र बघायला मिळत नाही.


दिवाळी येण्याच्या अगोदर १५ ते २० दिवस अगोदरच बाजारपेठा दिवाळीच्या सामानांनी, रोषणाईच्या लाइट्सने, कपड्यांची दुकाने कपड्यांनी आणि किराणामालाची दुकाने लोकांनी फुलून जातात. यावर्षी मात्र कमालीची मंदी असल्याचे तालुक्यातील सर्व व्यापारी आता खुलेआम बोलू लागले आहेत. एकतर बाजारात असलेली अभूतपूर्व मंदी आणि दिवाळीच्या तोंडावर आलेली दिवाळी यामुळे बाजारात एक प्रकारची मरगळ आली असल्याचे बाजारात वातावरण आहे.


निवडणूक २१ आॅक्टोबरला झाल्यानंतर २४ आॅक्टोबरला निकाल लागल्यानंतर मात्र बाजारात रेलचेल चालू होईल, अशी अपेक्षा व्यापारी करीत आहेत. या वेळी गणपतीच्या सणातील हंगाम अतिपावसामुळे वाया गेल्याने आधीच नाराज असलेले व्यापारी जर दिवाळीत बाजारात उठाव न झाल्यास हवालदिल होतील हे नक्की. दरवर्षी तालुक्यामध्ये दिवाळीच्या आधी शेतकरी भाताची कापणी पूर्ण करून भात खरेदी-विक्री केंद्रात विकून आपआपल्या कुटुंबाची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात; परंतु यावर्षी अतिपावसामुळे आणि पाऊस लांबल्याने भातकापणीला अजूनही सुरुवात न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.

ंएकीकडे विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असली तरी दिवाळी सण तोंडावर येऊनही पाली बाजारपेठेत मात्र शुकशुकाट आहे. किराणामालाचे
व्यपारी चिंताग्रस्त झाले आहेत.
- अशोक ओसवाल, व्यापारी

भात कापणी अजून न झाल्यामुळे यावर्षी दिवाळीआधी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आहे. भातकापणीला अजून दहा दिवस थांबावे लागेल असे दिसते. त्यामुळे यावर्षी दिवाळी बहुधा बेतानेच साजरी करावी लागणार, असे वाटते.
- किशोर चव्हाण, शेतकरी

Web Title: Markets fluctuate in the throes of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.