प्रतिकूल परिस्थितीवर शेतकऱ्याची मात; फूलशेतीतून शोधली स्वयंरोजगाराची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:46 PM2020-02-22T22:46:14+5:302020-02-22T22:48:32+5:30

दिवसाकाठी हजार रुपयांचे उत्पन्न; तीन गुंठ्यात लावली १२०० रोपे

Looking for self-employment, overcoming the situation and finding a flower garden | प्रतिकूल परिस्थितीवर शेतकऱ्याची मात; फूलशेतीतून शोधली स्वयंरोजगाराची वाट

प्रतिकूल परिस्थितीवर शेतकऱ्याची मात; फूलशेतीतून शोधली स्वयंरोजगाराची वाट

googlenewsNext

- राजीव नेवासेकर 

बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यात दुर्गम अशा भोईघर ग्रामपंचायतीतील काजुवाडी येथील शेतकरी रामदास पांडुरंग पाष्टे यांनी परिस्थितीवर मात करून आपल्या नऊ गुंठे क्षेत्रात फुलांची शेती फुलवून स्वयंरोजगाराची यशस्वी वाट शोधली आहे. अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची, कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मात्र भोईघर येथील शेतकरी पाष्टे यांनी आपल्या लहानशा जमिनीवर फूलशेती करून शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.

तालुक्यातील भोईघरमध्ये पाष्टे यांनी फणसाड धरणाच्या जवळ काजुवाडीतील आपल्या शेतातील नऊ गुंठे क्षेत्रातील तीन गुंठ्यांत शेवंतीची, तर तीन गुंठ्यांत झेंडूच्या (गोंड्याची) फुलांची व तीन गुंठे जमिनीत मका पिकवला आहे. २०१६ मध्ये अलिबाग-वाडगाव येथील नातेवाईक महादेव पाष्टे यांच्याकडून शेवंतीची तीनशे रोपे आणून लावली होती. २०१७ मध्ये केवळ एक गुंठ्यात रोपे लावली. यंदा याच ठिकाणी रोपे तयार करून आॅगस्ट महिन्यात तीन गुंठ्यांत १२०० रोपे लावण्यात आली. पाऊस लांबल्याने उशिरा लागवड करूनही पाष्टे यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. त्यांनी तीन गुंठे जागेत शेवंतीची व तीन गुंठे जागेत झेंडूची (गोंड्याची) रोपे लावली. उरलेल्या तीन गुंठे जागेत मक्याचे पीक, तर अर्ध्या गुंठ्यात पांढरा कांदा (उल) लावली आहे. आता संपूर्ण शेती बहरली असून दोन महिन्यांनंतर दिवसाकाठी हजाराचा रोजगार मिळत आहे.

बागायतदार शेतकºयांनी आपल्या बागायतीत नारळ, सुपारी, आंबा पिकाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात फुले, कांदा, मका व रताळी लागवड करून अंतर्गत पीक घेतल्यास स्वयंरोजगाराची वाट खुली होऊ शकते, असा विश्वास रामदास पाष्टे यांनी या वेळी व्यक्त केला.

सेंद्रीय खतांचा वापर
शेतात फुलांचे व कांद्याचे पीक घेताना, रासायनिक खतांचा वापर न करता यासाठी शेतातच ६ बाय १०चा खड्डा तयार करून त्यात पालापाचोळा व शेणाचा वापर करून सेंद्रीय खत तयार केले. परिणामी दोन महिन्यांनंतर फुलांच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागले असून, वेगळा अनुभव आणि स्वयंरोजगाराची आगळी वाट मिळाली आहे.

Web Title: Looking for self-employment, overcoming the situation and finding a flower garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी