भाषेमुळे तरुणाला लक्ष्य करून पुण्यात हत्या; गुन्हेगारांना तात्काळ अटक करा, ममता बॅनर्जींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:08 IST2026-02-13T11:06:43+5:302026-02-13T11:08:42+5:30
सुखेनच्या कुटुंबाला मी सांगते की, या दुःखाच्या वेळी बंगाल तुमच्यासोबत उभा आहे. न्याय मुळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न सोडले जाणार नाहीत

भाषेमुळे तरुणाला लक्ष्य करून पुण्यात हत्या; गुन्हेगारांना तात्काळ अटक करा, ममता बॅनर्जींची मागणी
पुणे : पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ‘आपलं घर हॉटेल’च्या मागे एका परप्रांतीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुकेन महातो (रा. ओडिशा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या तरुणाच्या हत्येनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
बॅनर्जी म्हणाल्या, महाराष्ट्रातील पुण्यात पुरुलियातील बंदवान येथील २४ वर्षीय स्थलांतरित कामगार सुखेन महातो यांच्या क्रूर हत्येने मी हादरले आहे. ही घटना शब्दांत सांगता येत नाही. सुखेन महातो हे त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. हा द्वेषपूर्ण गुन्हा आहे. भाषेमुळे आणि प्रादेशिक ओळखीमुळे त्याला लक्ष्य करून त्याचा छळ करण्यात आला. त्याची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे. सुखेनच्या कुटुंबाला मी सांगते की, या दुःखाच्या वेळी बंगाल तुमच्यासोबत उभा आहे. तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न सोडले जाणार नाहीत असे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.
कोरेगाव भीमा येथील पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या ‘आपलं घर हॉटेल’च्या मागे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, सुकेन महातो याच्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सुकेन महातो हा मूळचा ओडिशाचा रहिवासी असून तो कामाच्या निमित्ताने या परिसरात वास्तव्यास होता. त्याचा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची मदतही घेतली जात असल्याचे समजते.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शिरूर येथील फॉरेन्सिक विभागाला पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिस प्रशासन आरोपीचा कसून शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली. पोलिसांचे पथक तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढत आहे.