तरुणाला विवस्त्र करुन मारहाण; व्हिडिओ काढला, पिस्तुलातून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न, कोंढवा भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:45 IST2026-01-05T18:44:51+5:302026-01-05T18:45:01+5:30
तरुणाला विवस्त्र करुन आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यांतर तरुणाचे मोबाईलद्वारे व्हिडिओ काढला. त्याला शिवीगाळ करुन संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली

तरुणाला विवस्त्र करुन मारहाण; व्हिडिओ काढला, पिस्तुलातून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न, कोंढवा भागातील घटना
पुणे : आर्थिक वादातून तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. मारहाण करणाऱ्या आरोपींनी मोबाईलद्वारे तरुणाचे व्हिडिओ काढला, तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी आयुष कामठे, अभी म्हस्के, अभी पाटील, मंगेश माने, कौशल उर्फ ऋषी मोरे यांच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने येवलेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३१ वर्षीय तरुण वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. तो कोंढवा भागात राहायला आहे. आरोपी तरुणाच्या ओळखीचे आहेत. आर्थिक वादातून आरोपींनी ३१ डिसेंबर रोजी तरुणाला मारहाण करुन त्याचे कारमधून अपहरण केले. रात्री अकराच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानात आरोपी तरुणाला घेऊन गेले. तरुणाला विवस्त्र करुन आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यांतर तरुणाचे मोबाईलद्वारे व्हिडिओ काढला. त्याला शिवीगाळ करुन संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
आरोपी मंगेश माने याने कारमध्ये ठेवलेल्या पिस्तुलाचा धाक तरूणाला दाखवला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारु, अशी धमकी दिली. तरुणावर गोळीबार केला. या घटनेनंतर तरुण घाबरला होता. त्याने रविवारी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खराडे करत आहेत.