विश्वासाठी कार्य करणे कर्मयोग

By Admin | Updated: February 5, 2015 00:19 IST2015-02-05T00:19:37+5:302015-02-05T00:19:37+5:30

मानवाच्या अयोग्य संकल्पनांच्या आहारी जाण्याने त्याचा गुरुतत्त्वाशी असलेला सुसंवाद नाहीसा झाला आहे. त्यामुळे त्याचे जीवन दु:खमय झाले आहे.

Working for the universe Karma yoga | विश्वासाठी कार्य करणे कर्मयोग

विश्वासाठी कार्य करणे कर्मयोग

पुणे : मानवाच्या अयोग्य संकल्पनांच्या आहारी जाण्याने त्याचा गुरुतत्त्वाशी असलेला सुसंवाद नाहीसा झाला आहे. त्यामुळे त्याचे जीवन दु:खमय झाले आहे. आनंदी जीवनाकरिता पक्षी, प्राणी आणि इतर जीवजंतूंसह समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. विश्वकल्याणासाठी कार्य करणे हाच खरा कर्मयोग आहे, असे मत गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी व्यक्त केले.
गुरुतत्त्वयोग संस्थेच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट माण, लुई ब्रेल अंध-अपंग कल्याण संस्था, वाघोली यांना आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत देण्यात आली. चैतन्य ट्रस्टच्या नलिनी इनामदार, अंध-अपंग संस्थेचे अर्जुन केंद्रे, ज्ञानेश्वर केंद्रे यांनी मदत स्वीकारली. गुरुतत्त्वयोगचे प्रमुख विश्वस्त श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते ‘गुरुतत्त्ववेध’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सरदार म्हणाले, ‘‘गुरुतत्त्वयोग हा विशिष्ट वंश, जात, धर्म, पंथ, समाज यांपुरता मर्यादित नसून प्राणिमात्रा, वनस्पतींनाही त्याच्या मार्गदर्शनाचा फायदा होतो. गुरुतत्त्व आपल्याला नकळतपणे जगण्याचे धडे देत असते. यासाठी मानवी गुरुची आवश्यकता असतेच, असे नाही. जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग, अनुभव आपल्याला शिकवीत असून, त्यामधील गुरुतत्त्वाशी सुसंवाद साधून शिकणे आवश्यक आहे.’’
‘गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञानाची ओळख’ या विषयावर सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये माणसांमधील सहजप्रकृती, शरणागतसाधना आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. मानसी मांडे यांनी प्रास्ताविक केले. तेजा दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

ओळख उत्तुंग भरारी घेणाऱ्यांची
४अपंग व्यक्तींनी परिस्थितीवर मात करून मिळविलेले यश व त्या वेळी त्यांना मिळालेली गुरुतत्त्वाची साथ याविषयीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामध्ये हेलेन केलर, मुरलीकांत पेटकर, गिरीश शर्मा, टेम्पल ग्रांडीन, हेन्री फोर्ड, वॉल्ट डिस्रे, गौरी गाडगीळ आदींच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

Web Title: Working for the universe Karma yoga