Video: गाडी का उचलली? आळंदीत मद्यपी दुचाकीस्वार थेट रस्त्यावर टोईंग वाहनासमोरच झोपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:07 IST2025-05-15T16:06:24+5:302025-05-15T16:07:29+5:30

सम - विषम तारखेचे फलक बसविले नसल्याने शहरात वाहने पार्किंग करायची कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे

Why was the car lifted Drunk biker in Alandi fell asleep on the road right in front of the towing vehicle | Video: गाडी का उचलली? आळंदीत मद्यपी दुचाकीस्वार थेट रस्त्यावर टोईंग वाहनासमोरच झोपला

Video: गाडी का उचलली? आळंदीत मद्यपी दुचाकीस्वार थेट रस्त्यावर टोईंग वाहनासमोरच झोपला

 भानुदास पऱ्हाड

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी शहर तसेच देहू फाटा परिसरात अवैद्य पार्किंग केलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडूनकारवाई केली जात आहे. अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहने टोईंग वाहनात उचलून जप्त केली जात आहेत. मात्र वाहने पार्किंग करण्यासाठी संबंधित विभागाने पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली नाही किंवा सम - विषम तारखेचे फलक बसविले नसल्याने शहरात वाहने पार्किंग करायची कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 
         
देहू फाट्याजवळील काळे कॉलनीसमोर गुरुवारी (दि. १५) पोलिसांनी दुचाकी वाहनांवर कारवाई केली. रस्त्यालगत अवैद्य पार्किंग केलेल्या दुचाकींना टोईंग व्हॅनमध्ये उचलून नेण्यात येत होते. दरम्यान एक दुचाकी मालक थेट टोईंग व्हॅनसमोर रस्त्यावर आडवा झोपला. पोलिसांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र तो रस्त्यावरून उठला नाही. बराच वेळ पोलीस व त्याच्यात बाचाबाची झाली. सदरचा प्रकार पाहून अनेक प्रवाशी सभोवताली गर्दी करत आळंदी शहर व देहू फाट्यावर वाहने पार्किंग करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच सर्वत्र सम -  विषम तारखेचे फलक बसविण्यात यावेत, तोपर्यंत वाहनांवर कारवाई करू नये अशी मागणी केली. दरम्यान पोलिसांनी सदर दुचाकी मालकाला बाजूला केले. त्याची समजूत काढून दंड भरून घेतला. त्यांनंतर त्याची मोटरसायकल त्याच्या ताब्यात दिली.


            
आळंदीत वाहनचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत असून आपले वाहन उचलले गेल्यास ते सोडवण्यासाठी तब्बल ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे पर्यायी वाहन पार्किंग जागेचे कोणतेही सूचनाफलक माउली मंदिर परिसरात लावण्यात आलेले नाहीत. यामुळे वाहने लावायची कुठे हेच माहीत नसल्याने दूरवरून माउली दर्शनासाठी येणारे भाविक माउली मंदिर परिसरामध्ये असलेल्या जागेत वाहने लावतात. १५ ते २० मिनिटांच्या फरकाने वाहतूक पोलिसांकडून येथे लावलेल्या दुचाकी उचलल्या जातात. माउलींचे दर्शन घेऊन आलेल्या भाविकांना आपली वाहने न दिसल्याने ते चिंतेत पडतात आणि चौकशी केल्यावर त्यांना समजते की त्यांच्या वाहनांवर नो - पार्किंग कारवाई झाली आहे.

सदर इसमाची मोटरसायकल नो पार्किंग मध्ये असल्याने टोईंग कारवाई करण्यात आली होती. संबंधित नागरिक दंड भरण्यास तयार नव्हता. त्याने मद्यप्राशन केलेले होते. तो टोईंग गाडी समोर रस्त्यावर झोपला. असे कृत्य केल्यामुळे आपल्यावर होणारी कारवाई टळली जाईल असा त्याचा समज होता. त्या इसमास समजून सांगितल्यानंतर दंड भरून तो मोटरसायकल घेऊन गेला.   - सतीश नांदुरकर, पोलीस अधिकारी वाहतूक विभाग. 

Web Title: Why was the car lifted Drunk biker in Alandi fell asleep on the road right in front of the towing vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.