सकाळी आम्हाला गाडी आडवी का लावली? पुणे-अहिल्यानगर महामार्गावर एसटी अडवून काच फोडली, तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:38 IST2026-01-24T15:38:04+5:302026-01-24T15:38:21+5:30
टेम्पोतील लोखंडी पाइप काढून बसच्या काचेवर मारली, तसेच रोडच्या कडेचे दगड उचलून काचेवर मारून फोडली. चालकाच्या हातातील मोबाइल देखील फोडून नुकसान

सकाळी आम्हाला गाडी आडवी का लावली? पुणे-अहिल्यानगर महामार्गावर एसटी अडवून काच फोडली, तरुणावर गुन्हा दाखल
वाघोली : पुण्याहून नंदुरबार येथे निघालेल्या एसटीला अडवून टेम्पो चालक तरुणाने एसटीच्या काचा फोडल्याची घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावर लोणीकंद येथे बारावा मैल, समीक्षा ऑटोमोबाइलसमोर गुरुवारी (दि. २२ सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी एसटी चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एसटी चालक निशिकांत राठोड (रा. नंदुरबार) याने फिर्याद दिली असून, आनंद विनोद पवार (रा. लोणीकंद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एसटी घेऊन चालक राठोड नंदुरबार येथे जात असताना वाघेश्वर मंदिर चौक वाघोली येथे सकाळी आम्हाला गाडी आडवी का लावली असे बोलून बस टेम्पो चालकाने थांबविली. टेम्पोचा आरसा का फोडला भरून दे असे म्हणून पुढे निघून गेला. पुन्हा लोणीकंद येथे बससमोर टेम्पो उभा करून बस अडविली. टेम्पो चालकाने खाली उतरून शिवीगाळ करून आरसा फोडला, टेम्पोतील लोखंडी पाइप काढून बसच्या काचेवर मारली, तसेच रोडच्या कडेचे दगड उचलून काचेवर मारून फोडली. चालकाच्या हातातील मोबाइल देखील फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. तरुणाला घेऊन पोलिस स्टेशनला आले असता चालकाने फिर्याद देऊन आनंद पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.