हाॅटेल उशिरापर्यंत का सुरू ठेवले, खराडीत मद्यधुंद तरुणाकडून हाॅटेलची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:42 IST2026-01-02T09:42:11+5:302026-01-02T09:42:22+5:30
हाॅटेल उशिरापर्यंत का सुरू ठेवले, अशी विचारणा करून मद्यधुंद तरुणाने वाद घालण्यास सुरुवात केली

हाॅटेल उशिरापर्यंत का सुरू ठेवले, खराडीत मद्यधुंद तरुणाकडून हाॅटेलची तोडफोड
पुणे: खराडी भागातील एका हाॅटेलमध्ये तोडफोड करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला पोलिसांनीअटक केली. त्याने हाॅटेलमधील कामगाराला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी आतिष बाळासाहेब भगत (३२, रा. खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हाॅटेलमधील कामगार नीरज कमलेश गौतम (१९, रा. पाटीलबुवानगर, खराडी) याने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील झेन्सार आयटी पार्क परिसरात एक हाॅटेल आहे. हे हाॅटेल इराणी चहासाठी प्रसिद्ध आहे. मंगळवारी (दि. ३०) रात्री दहाच्या सुमारास भगत हाॅटेलमध्ये आला. हाॅटेल उशिरापर्यंत का सुरू ठेवले, अशी विचारणा करून त्याने कामगार नीलेश गौतम याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने हाॅटेल बंद करण्यास सांगितले. नीरजने हाॅटेल मालक नीलेश गुरव यांच्याशी संपर्क साधला. मद्यधुंद तरुणाने हाॅटेलमधील साहित्याची तोडफोड करून शिवीगाळ केली. घाबरलेल्या नीरजने या घटनेची माहिती गुरव यांना दिली. पोलिसांनाही कळवण्यात आले. त्यानंतर भगत याला ताब्यात घेण्यात आले. ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. भगत याला अटक करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक सावन आवारे पुढील तपास करत आहेत.