...जेव्हा चोरलेली आलिशान कार चोरटा पुन्हा जागेवर आणून ठेवतो! पुण्यातील आश्चर्यकारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 21:40 IST2020-11-02T21:36:58+5:302020-11-02T21:40:51+5:30

निलेश शहा यांची आलिशान गाडी शुक्रवार पेठेतील शंकरकृपा सोसायटीसमोर पार्क होती.

... when a stolen luxury car thief puts it back in place! Amazing events in Pune | ...जेव्हा चोरलेली आलिशान कार चोरटा पुन्हा जागेवर आणून ठेवतो! पुण्यातील आश्चर्यकारक घटना

...जेव्हा चोरलेली आलिशान कार चोरटा पुन्हा जागेवर आणून ठेवतो! पुण्यातील आश्चर्यकारक घटना

ठळक मुद्देपोलिसांकडून आरोपीवर अपघात व चोरीचा गुन्हा दाखल

पुणे : एकदा चोरी केलेली गोष्ट चोर शक्यतो परत करत नाही. आणि जरी समजा केली तरी थेट पोलिसांच्याच स्वाधीन.. चोरांचा हा तसा दंडकच आहे. पण पुण्यात एक आश्चर्य घडले. एका चोराने पार्क केलेली आलिशान गाडी रात्री चोरली. पण ती गाडी पुन्हा त्याच रात्री आहे त्या ठिकाणी आणून ठेवली. शेवटी त्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्याच. पुण्यातील शुक्रवार पेठेत ही घटना घडली.  

याप्रकरणी खडक पोलिसांनी रोहित ऊर्फ रवी खुडे (वय २०, रा. दांडेकर पुल) याला अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश शहा (रा. शुक्रवार पेठ) हे व्यावसायिक असून त्यांच्याकडे खुडे हा कामाला होता. त्यांनी त्याला कामावरुन काढून टाकले होते. याचा राग रोहितला होता. ते त्यांच्या गाडीची चावी कोठे ठेवतात याची त्याला माहिती होती. शहा यांची आलिशान गाडी शुक्रवार पेठेतील शंकरकृपा सोसायटीसमोर पार्क होती. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रोहित आला. त्याने त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजालगत असलेल्या चप्पल स्टॅडवरील भिंतीवर अडकविलेली कारची चावी घेतली. कार घेऊन तो निघाला. भरधाव जाताना वानवडी येथे त्याने एका दुचाकीस्वाराला धडक देऊन जखमी केले. त्यात कारचे पुढील भागाचे नुकसान झाले. त्यामुळे घाबरलेला रोहित कार घेऊन पुन्हा शुक्रवार पेठेत आला. त्याने कार होती तशी पार्क केली. चावी पुन्हा जागेवर ठेवली.

सकाळी शहा यांच्या कामगाराने गाडीचे नुकसान झाल्याचे पाहिल्यावर तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावरुन हा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी तपास करुन गुन्हा दाखल केला. त्यापूर्वीच वानवडी पोलिसांनी त्या कारवर अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. रोहितने कार आणून ठेवली तरी त्याने ती चोरुन नेली असल्याचे चोरीचाही गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: ... when a stolen luxury car thief puts it back in place! Amazing events in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.