पोलिस ठाण्यात मध्यरात्री आमदार टिंगरेंनी केले काय? भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह, पिझ्झा-बर्गर ठाण्यात आले कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 08:30 AM2024-05-23T08:30:39+5:302024-05-23T08:31:46+5:30

आमदार सुनील टिंगरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मध्यरात्री ३ वाजता त्यांचे परिचित असलेले विशाल अग्रवाल यांचा फोन आला...

What did MLA Tingre do in the police station at midnight? A question mark about the role, How did the pizza-burger come to Thane? | पोलिस ठाण्यात मध्यरात्री आमदार टिंगरेंनी केले काय? भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह, पिझ्झा-बर्गर ठाण्यात आले कसे?

पोलिस ठाण्यात मध्यरात्री आमदार टिंगरेंनी केले काय? भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह, पिझ्झा-बर्गर ठाण्यात आले कसे?

पुणे : लोकप्रतिनिधी म्हणून तिथे गेलो, कोणताही दबाव टाकला नाही, हा आमदार सुनील टिंगरे यांचा खुलासा असला, तरी मध्यरात्री इतका वेळ ते तिथे नेमके काय करीत होते, पिझ्झा बर्गर ठाण्यात आला कसा? तो ‘बाळा’ला दिला कुणी? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे एफआयआर लिहिणे, बाळ अल्पवयीन आहे, तर दुसऱ्याच दिवशी बालन्यायालयात उभे करून हास्यास्पद शिक्षेवर जामीन मिळवणे या गोष्टी तत्परतेने कोणामुळे घडल्या, ज्यांच्यामुळे घडल्या त्यांच्यावर काही कारवाई होणार की नाही? अशी चर्चा जोर धरत आहेत.

आमदार सुनील टिंगरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मध्यरात्री ३ वाजता त्यांचे परिचित असलेले विशाल अग्रवाल यांचा फोन आला. मुलाचा अपघात झाला आहे, असे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी असल्याने कर्तव्य म्हणून आपण लगेच पोलिस ठाण्यात गेलो, तिथे वरिष्ठ पोलिस अधिकारी नव्हते. त्यांना फोन केला, त्यावेळी ते ‘ससून’मध्ये होते. तिथे येतो असे सांगितल्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी मीच १० मिनिटांत पोलिस ठाण्यात येत आहे, असे सांगितले. ते आल्यावर त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर कायदेशीर काय कारवाई असेल ती करा, असे सांगून मी घरी आलो.

यात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे इतक्या मध्यरात्री तिथे जाणे बरोबर असले, तरी याआधी कितीवेळा ते असे कोणाच्या फोनवर मध्यरात्री पोलिस ठाण्यात गेले होते? असे विचारले जात आहे. एरवी पोलिस ठाण्यात एखाद्या आरोपीला आणले तर त्याला काय वागणूक दिली जाते हे सर्वांनाच माहिती आहे. अपघात भीषण होता, गंभीर होता, तो ज्याच्यामुळे झाला तो मुलगा पोलिसांसमोर होता, मग या मुलासाठी कायद्यातील पळवाटा कुणी शोधल्या? पोलिसांना त्या कोणी करायला सांगितल्या? पोलिस त्यानुसारच कसे वागले? इतकी तत्परता कशी दाखविली? असे अनेक प्रश्न या प्रकरणात अनुत्तरित आहेत. त्यांची उत्तरे पोलिस प्रशासनाने द्यावीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: What did MLA Tingre do in the police station at midnight? A question mark about the role, How did the pizza-burger come to Thane?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.