पुण्यात रस्त्यावरील खड्डयांबरोबरच आता पाण्याचे लोंढेही 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 07:00 AM2019-07-07T07:00:00+5:302019-07-07T07:00:04+5:30

गल्लीबोळातून वाहणारे पावसाच्या पाण्याचे लोंढे त्यांना मार्गच मिळत नसल्याने मुख्य रस्त्यावर वाहू लागले आहेत.

water rain and pothols on road at pune | पुण्यात रस्त्यावरील खड्डयांबरोबरच आता पाण्याचे लोंढेही 

पुण्यात रस्त्यावरील खड्डयांबरोबरच आता पाण्याचे लोंढेही 

Next
ठळक मुद्देरस्त्यांचा त्रास: थोडया पावसातही होतात वाहत्या नद्या

पुणे: पावसामुळे रस्त्यांमध्ये पडणाऱ्या खड्डयांबरोबरच आता वाहत्या पाण्याच्या लोंढ्यांचाही त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे. गल्लीबोळातून वाहणारे पावसाच्या पाण्याचे लोंढे त्यांना मार्गच मिळत नसल्याने मुख्य रस्त्यावर वाहू लागले आहेत. महापालिकेकडून तयार होत असलेल्या अशास्त्रीय रस्त्यांमुळेच शहरात बहुसंख्य ठिकाणी अशी स्थिती उद्भवत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
कोणताही रस्ता मध्यभागी उंच असावा, दोन्ही बाजूंनी त्याला सुक्ष्म उतार असावा, त्या उताराच्या बरोबर शेवटी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी म्हणून पन्हाळी ( एकसारख्या आकाराचा खोलगट भाग) असावा.

ही रस्ता बांधण्याची साधी पद्धत आहे. खडीचा, मुरमाचा, डांबरी किंवा अगदी सिमेंट काँक्रिटचा रस्ताही याच पद्धतीने बांधला जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे कितीही पाऊस झाला तरी त्याचे पाणी रस्त्यावर साचत नाही. ते पन्हाळीमधून वहात जात बरोबर गटारीच्या तोंडाला मिळते व तिथून आत जाऊन पुढे रस्त्याखालच्या गटारीतून वहात जाऊन नाल्याला किंवा जिथे सोडले आहे तिथे पोहचते. 
महापालिकेचे अभियंतेही रस्ता बांधणीचे हेच तंत्र असल्याचे सांगतात, प्रत्यक्षात मात्र गेल्या काही वर्षात पालिकेनेच या तंत्राला हरताळ फासला आहे. पालिकेची सगळी कामे ठेकेदारांच्या माध्यमातून होत असतात. ठेकेदारांनी अशा कामासाठी अनुभव नसलेले अभियंते नियुक्त केले आहेत. तसेच या कामांमधील अर्थपुर्ण व्यवहारांमुळे ते कसे होत आहे याकडे कधीही पाहिले जात नाही. कामाच्या दर्जाचे प्रमाणपत्र देण्यााचे कामही महापालिकेने तटस्थता यावी म्हणून पालिकेबाहेरच्या संस्थेला दिले आहे. त्यांच्याकडूनही अशी प्रमाणपत्रे कामांची तपासणी न करताच दिली जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.
काम सुरू असताना त्या भागातील क्षेत्रीय कार्यालयात नियुक्त अभियंत्याने त्याची वेळोवेळी तपासणी करणे अपेक्षित आहे. अशी तपासणीच होत नसल्याचेही आयुक्तांपासून सर्वांना माहिती आहे, मात्र त्यावर काहीही कारवाई केली जात नाही.
या सगळ्याचा परिणाम म्हणून शहरातील अनेक रस्ते म्हणजे वाहत्या नद्या झाले आहेत. थोडा जरी पाऊस पडला तरी रस्त्यांवर पाण्याची तळी साचतात. त्या खोलगट भागाची मर्यादा संपली की तेच पाणी पुढे रस्त्याच्या कडेने वाहू लागते. पावसाचा जोर कायम राहिला की याच पाण्याचे लोंढे होतात. रस्त्याच्या अगदी मधल्या भागापर्यंत हे पाणी साचते व वाहते. त्यातूनच वाहनधारकांना मार्ग काढावा लागतो. त्यातही चार चाकी वाहन आले व वेगात गेले की रस्त्यावर पायी चालणाºयांसह दुचाकी वाहनधारकांनाही सचैल स्नानच घडते. त्यावरून भांडणे होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.
भांडारकर रस्ता, कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता अशा शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील लहानमोठ्या रस्त्यांवरही आता पाण्याचे लोंढे वाहू लागले आहेत. यापैकी काही रस्त्यांची पाहणी केली असता त्यावरील दोन्ही बाजूंच्या पन्हाळीच गायब झाल्या असल्याचे निदर्शनास आले. मोठ्या रस्त्यांच्या मध्ये दुभाजक असतात. त्याच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांना नावालाही उतार नाही. विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावर तर गटारीचे तोंड पदपथावर आहे. काँक्रिट केलेल्या रस्त्यावर रस्त्याच्याच कडेने पावसाळी गटार म्हणून जाळ्या बसवल्या आहेत, मात्र त्या एकतर फुटून गेलेल्या किंवा जाळीच्या तोंडावरच कचरा साचलेल्या अशाच आहेत.

Web Title: water rain and pothols on road at pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.