पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला; वीर धरणात निम्म्याहून अधिक पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:33 IST2026-04-06T17:32:51+5:302026-04-06T17:33:38+5:30
नीरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर या धरणांत सतत कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू असून, वीर धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ होत आहे

पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला; वीर धरणात निम्म्याहून अधिक पाणीसाठा
नीरा : पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा फलटण तालुक्याला वरदान असलेल्या नीरा नदीवरील वीर धरणात आज रोजी निम्म्याहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. तर नीरा नदीच्या धरण साखळीतील चार धरणात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ४९.४२ पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नीरा नदीच्या काठावरील व डाव्या उजव्या कालव्या लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे.
नीरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर या धरणांत सतत कमी-जास्त प्रमाणात विसर्ग सुरू असून, वीर धरणाच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात शेतीला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नसल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहे.
नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये (दि.०६ एप्रिल) मागील वर्षी ४०.८२ टक्के पाणीसाठा होता. आजरोजी ४९.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी फायदा होणार आहे. पुणे, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणाऱ्या नीरा नदीवरील गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर व वीर या धरणांचा मोठा आधार राहिलेला आहे. या धरणातील पाण्यावर अनेक शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे.
वीर धरणाच्या दोन्ही कालव्यातून सध्या विसर्ग सुरू आहे. नीरा डावा कालव्यात ८२७ क्युसेकने विसर्ग चालू आहे. तर नीरा उजवा कालवा १ हजार ५५० क्यूसेकने सुरू आहे. त्यामुळे नदीकाठचा व कालव्यावर शेती अवलंबून असलेला शेतकऱ्यांची सिंचनाचे अडचण दूर होणार आहे. - संभाजी शेडगे : कर्मचारी, वीर धरण प्रशासन