टेक महिंद्रा कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी विशाखा गायकवाडसह दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 16:29 IST2020-03-23T15:55:31+5:302020-03-23T16:29:13+5:30
टेक महिंद्र आणि आयबीटी सोल्युशन्स कंपनीतला विशाखा गायकवाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

टेक महिंद्रा कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी विशाखा गायकवाडसह दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : टेक महिंद्र कंपनीत शिरून ती बंद करा, असे धमकावत त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर ते व्हाट्स अॅपवर व्हायरल करून कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनीमनसेच्या विशाखा गायकवाडसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
टेक महिंद्र आणि आयबीटी सोल्युशन्स कंपनीत १९ व २१ मार्च रोजी हा प्रकार घडला होता. त्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी टेक महिंद्र कंपनीच्यावतीने सुपरवायझर संजय रामेश्वर इंगळे यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी (दि. १९) सायंकाळी ७ वाजता कंपनीत काम करत असताना मनसेच्या विशाखा गायकवाड (रा. वडगाव शेरी) व विजय गायकवाड (रा.वाघोली) कंपनीच्या सुरक्षा कर्मचारी यांना धमकावून कंपनीत काम करीत असलेल्या कामागरांचे लॉबीमध्ये गेले़ कंपनी बंद करा, नाही तर कंपनीतील बॉसला उचलून नेतो. उद्यापासून कंपनीच्या गेटवर माझे लोक बसतील. कंपनीतील कोणालाही बाहेर जाऊ देणार नाही़ अशाप्रकारे फिर्यादीस धमकावून कंपनीतील अधिकारी यांना कोरोना व्हायरसचे गांभीर्य नाही, असे म्हणून त्यांच्या मोबाईलमधून व्हिडीओ शूटिंग करून, त्याचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर प्रसारित करून कंपनीची बदनामी केली़.
दुसरी फिर्याद आयबीटी सोल्युशन्स या कंपनीचे प्रशासकीय अधिकारी राहुल मोहन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. विशाखा गायकवाड व तिघे अनोळखी यांनी २१ मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगर रोडवरील कंपनीमध्ये बेकायदारीत्या प्रवेश केला. कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांना दमदाटी करून कोरोना विषाणूची बाधा झाल्यास त्यास कंपनी जबाबदार राहील, असे सांगून कंपनीतील कामगारांना बाहेर काढून कंपनीचे काम बंद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर. ए. पाटील अधिक तपास करीत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाही कंपन्या सुरू असल्याच्या कंपनीतील कामगारांच्या तक्रारी आहेत. मात्र, अनेक कंपन्यांकडे बँकेच्या ऑनलाईन, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या सेवांचे काम आहे़ हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने या कंपन्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
०००