प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:00 IST2025-11-05T20:00:24+5:302025-11-05T20:00:45+5:30
१ वर्षापूर्वी इमरान याच परिसरात राहायला आला होता. त्यामुळे हा वाद आणखी वाढला होता. एक वर्षापूर्वी समीर दुबईला गेल्याचे रूबीने शेजाऱ्यांना सांगितले होते.

प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
अहमदाबाद - उत्तर प्रदेशच्या मुस्कान रस्तोगी आणि मध्य प्रदेशच्या सोनम रघुवंशीसारखेच भयंकर कृत्य गुजरातच्या अहमदाबाद येथे रूबीने केले आहे. याठिकाणी फतेवाडी परिसरात घडलेल्या घटनेने सगळेच हैराण झाले आहेत. रुबीने तिचा प्रियकर आणि २ मित्रांसोबत मिळून पती समीर अंसारीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून घरच्या किचनमध्ये गाडले. त्यावर सिमेंट आणि टाइल्स लावून हे हत्याकांड लपवण्याचा प्रयत्न केला. १४ महिने या घटनेची कुणाला भनकही लागली नाही.
अहमदाबाद क्राइम ब्रांचला ३ महिन्यापूर्वी गुप्त माहिती मिळाली. फतेवाडी येथे राहणारा समीर अंसारी गेल्या वर्षभरापासून गायब आहे, परंतु त्याच्या बेपत्ता होण्यामागे अत्यंत खतरनाक सत्य दडले होते. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला तेव्हा मागील १४ महिन्यापासून समीरचा मोबाईल बंद असल्याचं कळले. तो कुणाच्याही संपर्कात नव्हता. इतका काळ तो कुठे आहे याची माहिती कुणाला नव्हती. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर तपासाची चक्रे वाऱ्याच्या वेगाने फिरली. या घटनेबाबत डीपीसी अजीत राजियान यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, १४ महिन्यापासून बेपत्ता असलेल्या समीर अंसारीची हत्या त्याची पत्नी रूबीने केली होती. या हत्येत रूबीचा प्रियकर इमरान आणि त्याच्या २ मित्रांचा समावेश आहे. पोलिसांनी इमरानला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. रुबीच्या सांगण्यावरून समीरची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत समोर आले. या चौघांनी मिळून समीरची ठरवून हत्या केली होती.
हात-पाय बांधून जीवे मारले
आरोपींनी आधी समीर अंसारीचे हातपाय बांधले, त्यानंतर शस्त्राने त्याच्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर समीरच्या मृतदेहाचे तुकडे कापून किचनमधील जमिनीखाली गाडून टाकले. त्यावर सिमेंट टाकून टाईल्स लावली, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. क्राइम ब्रांचच्या पथकाने समीरच्या घरी खोदकाम सुरू केले, जिथे तो रूबीसोबत राहत होता. तेव्हा मानवी सांगाडा सापडला. पोलिसांनी मानवी हाडे जप्त करून डीएनए चाचणीसाठी पाठवली. रुबी आणि समीर मागील ५ वर्षापासून या परिसरात राहत होते. ३ वर्षापूर्वी या दोघांनी लग्न केले. त्यानंतर रूबी आणि इमरान यांच्या नात्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण होत असे. १ वर्षापूर्वी इमरान याच परिसरात राहायला आला होता. त्यामुळे हा वाद आणखी वाढला होता. एक वर्षापूर्वी समीर दुबईला गेल्याचे रूबीने शेजाऱ्यांना सांगितले होते.
हत्येनंतर घर भाड्याने दिले
रूबी आणि इमरान सातत्याने एकत्र दिसत होते. कुणीही समीरला वर्षभरापासून पाहिले नाही. मंगळवारी रात्री जेव्हा पोलीस इमरानला घेऊन खोलीवर आली तेव्हा समीरच्या हत्येचे सत्य उघड झाले. पत्नीने प्रियकरासोबत मिळून समीरची हत्या केली होती. हत्येनंतर काही महिने रूबी त्याच घरात राहत होती. त्यानंतर तिने घर भाड्याने दिले होते. रुबीच्या लग्नानंतर समीर त्याची आई आणि नातेवाईकांच्या संपर्कात नव्हता. त्यामुळे समीरच्या हत्येचे रहस्य १४ महिने गूढच राहिले.