Leopard Attack: चिमुकलीचा जीव घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक; बिबटे अजून किती जीव घेणार?, रास्ता रोको आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:37 IST2025-10-17T12:36:10+5:302025-10-17T12:37:08+5:30
शिरूरच्या पिंपरखेड परिसरात १५० ते १७५ बिबटे वास्तव्यास असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे

Leopard Attack: चिमुकलीचा जीव घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक; बिबटे अजून किती जीव घेणार?, रास्ता रोको आंदोलन
मलठण : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे रविवारी (दि. १२) चिमुकली शिवन्यावर बिबट्याने हल्ला करून तिचा जीव घेतल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याचा आरोप करत, गावकऱ्यांनी गुरुवारी (दि. १६) पंचतळे येथे जेजुरी-बेल्हा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे अडीच ते तीन हजार ग्रामस्थ, विशेषतः शेकडो महिला, सहभागी झाल्या होत्या. बिबटे अजून किती जीव घेणार, असा सवाल जनतेने वनविभागाला विचारला आहे.
या आंदोलनात ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पिंपरखेड परिसरात १५० ते १७५ बिबटे वास्तव्यास असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘भरदिवसा बिबटे मानवी वस्तीत फिरतात, वारंवार माहिती देऊनही वनविभाग त्वरित कारवाई करत नाही. पिंजरा लावण्याची मागणी केल्यास तुम्ही गाडी आणि माणसे घेऊन या, मग पिंजरा लावू, अशी उत्तरे मिळतात,’ अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनामुळे पंचतळे परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आंदोलनाला शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, माउली ढोमे, सुरेश भोर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, पंचायत समितीचे डॉ. सुभाष पोकळे, दामू घोडे, संपत पानमंद, प्रफुल्ल बोंबे, भाऊसाहेब औटी, श्रीकांत डेरे, सीमा थिटे, हरिभाऊ शेलार, शरद बोंबे, नरेश ढोमे, नितीन पिंगळे, विकास वरे, विक्रम निचीत, अशोक दाते यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला. वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना ग्रामस्थांनी निवेदन सादर केले. यावेळी शिवन्याची आई आणि तिची छोटी बहीण यांनीही निवेदन देत आक्रोश व्यक्त केला.
वनमंत्र्यांसोबत बैठक, उपोषणाचा इशारा
शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील चार-पाच दिवसांत परिसरातील प्रमुख व्यक्तींची वनमंत्र्यांसोबत तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच, बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास सोमवारपासून (दि. २०) स्थानिक नागरिक आमरण उपोषण करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.