Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:37 IST2025-05-22T17:36:19+5:302025-05-22T17:37:02+5:30
बाळ आता आमच्याकडे सुखरूप असून त्याला आम्ही आयुष्यभर सांभाळणार आहोत

Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
पिंपरी : दहा महिन्यांचे बाळ आमच्याकडे आले अन् जणू आमची वैष्णवीच आमच्या घरी परतली आहे, अशी भावना वैष्णवीची आई स्वाती कस्पटे यांनी व्यक्त केली. बाळाला पाहून कस्पटे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.
वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर वैष्णवीचा १० महिने वयाचा जनकराजे हा चिमुरडा मुलगा आईपासून पोरका झाला. वैष्णवीचे बाळ हे एका त्रयस्थ व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामाने केला होता. वैष्णवीचे बाळ आमच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी वैष्णवीच्या आईवडिलांनी केली होती. त्यानंतर तातडीने बाळाला त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. बाणेर येथे महामार्गावर बाळ एका अज्ञात व्यक्तीने कस्पटे कुटुंबियांकडे सोपवले आहे.
कस्पटे कुटुंबीय याबाबत म्हणाले, ‘‘आम्हाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. तुम्ही ज्या बाळाच्या शोधात आहात ते माझ्याकडे आहे, मला ते तुम्हाला द्यायचे आहे, असे अज्ञात व्यक्तीने फोनवरून संगितले. बाळ घेण्यासाठी बाणेर येथे महामार्गावर बोलवले. तिथे गेल्यावर अज्ञात व्यक्तीने बाळ आमच्या ताब्यात दिले. आता आम्हाला खूप आनंद होतोय. बाळ आता आमच्याकडे सुखरूप आहे. त्याला आम्ही आयुष्यभर सांभाळणार आहोत, असे बाळाचे आजोबा आनंद उर्फ अनिल कस्पटे यांनी सांगितले.