नियंत्रण सुटल्याने दुचाकी सिमेंटच्या बाकड्याला आदळली; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, न्हावरे - बीड महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:10 IST2025-12-10T13:08:35+5:302025-12-10T13:10:18+5:30
शिरसगाव येथून पुन्हा मलठणकडे परत जात असताना वेगात निर्वी येथे असलेल्या वळणावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी मांडलेल्या सिमेंटच्या बाकडावर जाऊन आदळली

नियंत्रण सुटल्याने दुचाकी सिमेंटच्या बाकड्याला आदळली; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, न्हावरे - बीड महामार्गावरील घटना
न्हावरे : न्हावरे - बीड महामार्गावर निर्वी (ता. शिरूर ) येथे भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेच्या सिमेंटच्या बाकडावर आदळून झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. ७) सायंकाळी घडली. बाळू भीमा बरकडे (वय २८, ,रा. दत्तनगर, मलठण ता. शिरूर) असे अपघातातमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी कोमल बाळू बरकडे (वय २४) ही गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी बाळू बरकडे हे पत्नीसह त्यांची मोटारसायकल घेऊन शिरसगाव काटा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. शिरसगाव येथून पुन्हा मलठणकडे परत जात असताना वेगात निर्वी येथे असलेल्या वळणावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी मांडलेल्या सिमेंटच्या बाकडावर जाऊन आदळली. यामध्ये बरकडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. दरम्यान ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार प्रताप टेंगले हे करत आहेत.