धायरी: पुण्यातील सातत्याने अपघाताचे केंद्र ठरत असलेल्या नवले पूल परिसरात आज (शुक्रवार) सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. कात्रज चौकाकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, पाच चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आज शुक्रवार, दि. १३ मार्च रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास नवले पुलाखालील चौकात नेहमीप्रमाणे वाहने सिग्नल सुटण्याची वाट पाहत थांबली होती. याच वेळी कात्रज बोगद्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. उतारावरून वेगात असलेल्या या ट्रकने समोर थांबलेल्या वाहनांना अक्षरशः उडवत नेले.
ट्रकने सर्वात आधी एका दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पुढे असलेल्या पाच चारचाकी वाहनांना एकापाठोपाठ एक धडक दिली. यामध्ये या सर्व वाहनांचा मोठा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली. रस्त्यावर वाहनांचे अवशेष आणि गर्दी जमल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पथक आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मृत दुचाकीस्वाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. नवले पूल परिसरातील तीव्र उतार आणि वाहनांचा वेग यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. प्रशासनाने कितीही उपाययोजना केल्या असल्या, तरी अपघातांची मालिका थांबत नसल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Web Summary : A speeding truck on Navale Bridge, Pune, hit vehicles stopped at a signal, killing a biker and damaging several cars. Police are investigating the accident, a frequent occurrence due to the steep slope. Locals express anger over continued accidents.
Web Summary : पुणे के नवले पुल पर तेज रफ्तार ट्रक ने सिग्नल पर खड़े वाहनों को टक्कर मार दी, जिससे एक बाइक सवार की मौत हो गई और कई कारें क्षतिग्रस्त हो गईं। पुलिस मामले की जांच कर रही है। ढलान के कारण यहां अक्सर हादसे होते रहते हैं।