योजनांपासून आदिवासी वंचित

By Admin | Updated: June 13, 2015 23:41 IST2015-06-13T23:41:12+5:302015-06-13T23:41:12+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव (ता. आंबेगाव) हे मावळ तालुक्यापासून ८० किलोमीटर दूर असल्याने या तालुक्यातील आदिवासी लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत.

Tribal disadvantaged from the schemes | योजनांपासून आदिवासी वंचित

योजनांपासून आदिवासी वंचित

वडगाव मावळ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव (ता. आंबेगाव) हे मावळ तालुक्यापासून ८० किलोमीटर दूर असल्याने या तालुक्यातील आदिवासी लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. मावळ तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव या चार तालुक्यांचे कार्यालय घोडेगाव येथे आहे. मावळ तालुक्यापासून हे कार्यालय ८० किलोमीटर दूर आहे. मावळ तालुक्यात सुमारे ३५ टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची असून, हा समाज डोंगर-दऱ्यांत वास्तव्य करत आहे.
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून ठक्कर बापा योजनांतर्गत पाणी, रस्ते, पथदिवे व मूलभूत सुविधा दिल्या जातात. आदिवासी नागरिकांना जातीच्या दाखल्यासाठी या कार्यालयात धाव घ्यावी लागते.
अशिक्षित व आर्थिक मागास आदिवासी समाजातील व्यक्ती मासेमारी, जंगलातील फळे गोळा करणे, शेतमजूर व इतर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. आदिवासींना विविध दाखले व शासकीय योजनांसाठी घोडेगावला जावे लागते. अनेक वेळा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयात भेट होत नाही. यामुळे तालुक्यातील आदिवासींचा वेळ व पैसा वाया जात असल्याने नागरिक या कार्यालयाकडे पाठ फिरवत आहेत.
अनेक आदिवासींचा शासकीय योजनांपासून वंचित असल्याने विकास झाला नाही. अनेक आदिवासी कुटुंबांकडे जातीचे दाखले नसल्याने त्यांना योजनांचा लाभ मिळत नाही, तर काही कुटुंबांची आर्थिक कुवत नसल्याने घोडेगावला जाणे शक्य होत नाही. अनेकांना या कार्यालयाचीच माहिती नाही. मावळ तहसील कार्यालयात प्रकल्प कार्यालयाचे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अतीश परदेशी, मधू कोकाटे, सविता पिचड, अनिल गोडे व नागरिकांनी केली. (वार्ताहर)

Web Title: Tribal disadvantaged from the schemes