पुण्यात वाहतूक पोलिसांची वर्षभरात १८.७२ लाख वाहनचालकांवर कारवाई; ५४ कोटींपेक्षा अधिकची दंडवसुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:45 IST2025-12-30T10:44:54+5:302025-12-30T10:45:27+5:30
एकेरी वाहतुकीच्या रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर सर्वाधिक म्हणजेच ५ लाख १ हजार ६६७ जणांवर कारवाई करण्यात आली

पुण्यात वाहतूक पोलिसांची वर्षभरात १८.७२ लाख वाहनचालकांवर कारवाई; ५४ कोटींपेक्षा अधिकची दंडवसुली
पुणे: शहरातील वाहतुकीच्या बेशिस्तीवर लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी यंदा आक्रमक भूमिका घेतली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ७२ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मागील वर्षाच्या तुलनेत ७ लाख ६८ हजारांनी अधिक आहे. या कारवाईतून आतापर्यंत ५४ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
शहरात २०२३ मध्ये १० लाख ३२ हजार ४१५, तर २०२४ मध्ये ११ लाख ४ हजार १४५ वाहनचालकांवर कारवाई झाली होती. मात्र, चालू वर्षात या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यंदा एकेरी वाहतुकीच्या रस्त्यांवर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर सर्वाधिक म्हणजेच ५ लाख १ हजार ६६७ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर टोईंग कारवाई २ लाख १३ हजार ६४६, सिग्नल जंपिंग १ लाख ७१ हजार २०२ आणि ट्रिपल सीट ६८ हजार ९४० प्रकरणांचा समावेश आहे. सीसीटीव्ही कारवाईबरोबरच प्रत्यक्ष रस्त्यावरील कारवाई वाढवून दंडाची थेट वसुली करण्यात येत असल्याचेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.