नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय; जुन्नर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:16 IST2025-06-25T11:15:51+5:302025-06-25T11:16:08+5:30

जुन्नर तालुक्यात बाराशे फूट खोल दरीत ४० वर्षीय पुरुष व एका युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती

Tired of relatives' troubles extreme decision taken College girl from Junnar taluka dies | नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय; जुन्नर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय; जुन्नर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

जुन्नर: तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या दुर्गवाडीच्या कोकणकड्याखालील सुमारे बाराशे फूट खोल दरीत ४० वर्षीय पुरुष व एका युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. जुन्नरपोलिस व शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मुसळधार पावसात व जोरदार वाऱ्यात प्रतिकूल परिस्थितीवर मृतदेह बाहेर काढले. हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा तसेच ते एकमेकांचे नातेवाईक असल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत व बेपत्ता असलेले रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि दुर्गवाडी जवळील आंबोली (ता. जुन्नर) येथून बेपत्ता असलेली अल्पवयीन महाविद्यालयीन युवती रूपाली संतोष खुटाण या दोघांचे हे मृतदेह असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली.

मृत तलाठी पारधी हे दुर्गवाडी येथील मूळ रहिवासी असून कामानिमित्त श्रीगोंदा येथे वास्तव्यास होते. पारधी हे काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने अहिल्यानगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तर मृत युवती रूपाली ही देखील बेपत्ता असल्याची तक्रार दि १५ मे रोजी जुन्नर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. तिचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाल्याचा संशय तिचे नातेवाईक व्यक्त करत होते.    
                     
दरम्यान, दुर्गवाडी येथे घाटमाथ्यावरील कोकण कड्यावरून घाटाखाली कोसळणाऱ्या उरफाट्या धबधब्यापासून काही अंतरावर एक पांढऱ्या रंगाची नवीन चारचाकी काही दिवसांपासून बेवारस उभी असल्याचे तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तसेच कोकणकड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला सापडल्या. यावरून कोणीतरी कड्यावरून पडले असावे वा आत्महत्या केली असावी, असा संशय ग्रामस्थांना आला. पोलिस तसेच शिवजन्मभूमी रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी शोध घेतला असता कड्याखाली रूपालीचा मृतदेह आढळून आला, तर त्यापासून काही अंतरावर मृत तलाठ्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या मृतदेहाच्या कपड्यामध्ये सापडलेल्या चिठ्ठीमध्ये आपण नातेवाइकांच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. सदर चिट्ठी या दोघांनीही दि. १४ रोजी लिहिली होती. या प्रकरणी अधिकचा तपास जुन्नर पोलिस करीत आहेत.

Web Title: Tired of relatives' troubles extreme decision taken College girl from Junnar taluka dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.