काळाचा घाला! पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे; पाहुण्यांची अखेरची भेट, मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 19:35 IST2025-01-17T19:35:13+5:302025-01-17T19:35:50+5:30

अपघातात चक्काचूर गाड्या, अडकलेल्या नागरिकांचा जीवाचा आकांत, डोळ्यासमोर असणारे मृतदेह सर्वकाही मनहेलावून टाकणारे होते

Time's up! Dreams of becoming a police officer remain unfulfilled; Last visit from guests, a mountain of grief for the family of the deceased | काळाचा घाला! पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे; पाहुण्यांची अखेरची भेट, मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

काळाचा घाला! पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे; पाहुण्यांची अखेरची भेट, मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पुणे: आळेफाटा येथून प्रवासी घेऊन जाणाऱ्या मॅक्झिमो व्हॅनला आयशर टेम्पोने दिलेल्या मागील बाजूने दिलेल्या धडकेमुळे व्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या बंद एसटी बसला जाऊन धडकली. या भीषण अपघातात ९ जण ठार झाले. आणि 8 जण जखमी झाले आहे. हा अपघात सकाळी ९.४५ वा. च्या सुमारास पुणे – नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळील मुक्ताई धाब्यापासून अर्ध्या किमी अंतरावर झाला. मनहेलावून टाकणाऱ्या या अपघातात ५ प्रवासी कांदळी गावच्या हद्दीतील असल्याने गावात शोककळा पसरली आहे. जखमी प्रवाशांवर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात आणि १ प्रवाशाला पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी झालेल्या मध्ये ४ महिला , ४ पुरुष आणि १ पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेत तरुणाचे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. तर एका कुटुंबाची भेट अखेरची ठरली.   

प्राथमिक शिक्षिका मनीषा पाचरणे वर काळाने घाला केला मात्र मुलगा बचाविला 
  
मनीषा पाचरणे याचे सासर पारनेर तालूक्यातील मात्र नोकरी निमित्त त्या १४ नंबर येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ शिक्षक सोसायटी मध्ये स्वत:चा रो-होऊस घेऊन पती निवृत्त शिक्षक नानासाहेब पाचरणे यांचे सह मुले आर्यन व सार्थक ( सोनू ) यांच्या सोबत वास्तव्यास होत्या. सार्थक हा दिव्यांग आहे. मनीषा पाचरणे या नारायणगाव येथील आनंदवाडी येथे प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शांत आणि संयमी स्वभावाच्या असल्याने सर्वांशी त्यांचे चांगले ऋणानुबंध होते. रोजच्या प्रमाणे घरची कामे उरकून त्या कांदळी येथून शाळेत जाण्यासाठी निघाल्या. त्यांच्या सोबत आर्यन होता. आर्यनला नारायणगाव येथील गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर येथे १० वी ची टेस्ट देण्यासाठी जायचे होते. परंतु तो मोटरसायकलवर जाणार असल्याने आर्यनने आईला मॅक्झिमो व्हॅनमध्ये बसवून दिले. आणि ३ किमी अंतरावर गेल्यावर मनीषा पाचरणे यांचे वर काळाने घाला केला. आई सोबत आर्यन गेला नसल्याने तो बचावला. दोन वर्षानंतर त्या सेवानिवृत्त होणार होत्या.  त्यांच्या अपघाती निधनाने पाचारणे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

युवराज वाव्हळ याचे पोलीस अधिकारी व्हायचे स्वप्न राहिले अधुरे 
   
युवराज महादेव वाव्हळ हा युवक मुळचा नारायणगावचा परंतु वडिलांचे फब्रिकेशनचा व्यवसाय असल्याने तो आपल्या कुटुंबां सोबत १४ नंबर येथे वास्तव्यास होता. एक वर्षापूर्वी पदवीधर झाल्यानंतर पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न त्याचे होते. त्यासाठी नारायणगाव येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. नारायणगाव येथे एका अकादमीत अभ्यास करण्यासाठी सकाळी जात असताना १४ नंबर येथून मॅक्झिमो व्हॅन मध्ये बसला आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. आणि या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस अधिकारी व्हायचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. त्याच्या पश्यात वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे.
   
पाहुण्याची भेट अखेरची ठरली 

राजगुरुनगर ता. खेड येथील नजमा अहमद हनीफ शेख या वडगाव कांदळी येथे एका नातेवाईकांकडे तिजा कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांच्या सोबत अन्य २ जण होते. ते पाहुण्यांना भेटून त्या व त्यांच्या सोबत आलेले सर्वजण राजगुरुनगर येथे जाण्यासाठी सकाळी निघाले होते.  नजमा शेख व दोन वर्षीय वशिफा वशिम इनामदार यांचा अपघातात मृत्यू झाला, त्यांची आणि पाहुण्याची भेट अखेरची ठरली .
 
अपघात होताच नागरिकांनी दाखविले माणुसकीचे दर्शन 

प्रत्यक्ष घटनास्थळी असलेले वडगाव कांदळी , ता. जुन्नर येथील सुनील पवार म्हणाले कि, मी सकाळी ९.४५ वाजता नारायणगावहून वडगाव कांदळी कडे जात असताना मुक्ताई ढाब्याजवळ आळेफाटा कडून नारायणगावकडे जाणारी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात नुकताच झाला होता. आयशर टेम्पोने धडक दिल्याने प्रवासी गाडीतील प्रवासी अडकून पडले होते. रस्त्याच्या कडेला बंद पडलेली एसटी उभी होती. टेम्पोने मागून धडक दिल्याने प्रवासी गाडीतील प्रवासी अडकून पडले होते. आयशर टेम्पो व चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला होता. प्रवासी गाडीतील ड्रायव्हरसह सात जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. आम्ही काही लोकांना थांबवून प्रवासी लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरु केलं.  सरकारी यंत्रणा येण्याअगोदरच मदत कार्य सुरू केले होते. धडक एवढी गंभीर होती की, गाडीचा दरवाजा खोलत नव्हता. घटनास्थळी लोकांनी जेसीबी व ट्रॅक्टर बोलावून दोन्ही गाड्या बाजूला केल्या व  मदतकार्य चालू केले. आतमध्ये दोन मुली अडकल्या होत्या. त्या जीवाच्या आकांताने ओरडत होत्या. नागरिकांनी दरवाजा तोडून लोकांना बाहेर काढले. एका महिलेच्या तर अक्षरश पाय तुटून बाजूला पडला होता. अपघातातील चक्काचूर गाडी पहिल्या नंतर प्रत्येकाचे मन हेलावून गेले होते.

Web Title: Time's up! Dreams of becoming a police officer remain unfulfilled; Last visit from guests, a mountain of grief for the family of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.