देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! न्हावरे - चौफुला रस्त्यावर दुचाकी खांबाला धडकून सहप्रवाशाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:08 IST2025-01-02T13:06:28+5:302025-01-02T13:08:18+5:30
अपघातात दुचाकीच्या पाठीमागच्या सीटवर बसलेले सहप्रवासी रस्त्यावर उडून पडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! न्हावरे - चौफुला रस्त्यावर दुचाकी खांबाला धडकून सहप्रवाशाचा मृत्यू
न्हावरे : येथील घोडगंगा कारखान्यानजीक न्हावरे - चौफुला रस्त्यावर मोटारसायकल खांबाच्या लोखंडी तान्याला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातात जळबा अशोक सावते (वय ३२, मुळगाव देवसरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर) यांचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद भरत शशिराव काकडे यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेचे सविस्तर माहिती अशी की, किशोर सखाराम खडसे व त्यांचा मित्र मयत जळबा अशोक सावते हे दुचाकीवरून फलटण येथे देवदर्शनासाठी चालले होते. दरम्यान, न्हावरे चौफुला रस्त्यावर घोडगंगा कारखान्यानजीक रस्त्याला खेटून असलेल्या विजेच्या खांबाच्या लोखंडी तान्याला दुचाकी धडकली. अपघातात दुचाकीच्या पाठीमागच्या सीटवर बसलेले जळबा सावते रस्त्यावर उडून पडले. त्यात जळबा सावते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार धनंजय थेऊरकर करत आहेत.