सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 07:20 IST2026-05-02T07:19:19+5:302026-05-02T07:20:32+5:30
गुडघाभर पाण्यात उभे असताना घडली दुर्घटना

सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
पुणे - सेल्फीचा माेह सहलीसाठी आलेल्या तीन मित्रांच्या जिवावर बेतला. ही दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावाजवळील जाधववाडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. अजय गरुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार अशी मृतांची नावे आहेत.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील सहा मित्रांचा एक गट सहलीसाठी येथे आला होता. यापैकी चौघे गुडघ्यापर्यंत पाण्यात उभे राहून सेल्फी काढत होते. त्यावेळी काठाजवळ उभा असलेला एक जण घसरून खोल पाण्यात पडला. चारही जणांनी एकमेकांच्या मानेभोवती हात घातलेले असल्याने एकामागून एक पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले.
...अन् एकाला वाचविण्यात यश
घटनास्थळापासून थोड्या अंतरावर उभा असलेला मित्र मदतीसाठी धावला. त्याने एकाला बाहेर काढले. मात्र, उर्वरित तिघे पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’ आणि ‘शिवदुर्ग रेस्क्यू ग्रुप’चे पथक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. काही वेळाच्या प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करीत आहेत.