युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 10:11 IST2026-05-02T10:08:38+5:302026-05-02T10:11:26+5:30
‘ब्रेंट क्रूड’ गेले १२६ डॉलर पार; २००८ च्या जागतिक मंदीनंतर तेलाचे दर सर्वोच्च पातळीवर

युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
नवी दिल्ली - अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याऐवजी युद्धाची ठिणगी अधिक गडद झाल्याने गुरुवारी जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतींचा स्फोट झाला. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल १२६.४१ डॉलरचा टप्पा गुरुवारी ओलांडला होता. मात्र शुक्रवारी हे दर कमी होऊन ते प्रति बॅरल ११४ डॉलरवर स्थिरावले होते.
अमेरिका आणि इराणमधील चर्चा निष्फळ ठरली असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव फेटाळल्याच्या वृत्ताने आगीत तेल ओतले आहे. इराणकडून होणारा तेलपुरवठा ठप्पच राहणार असल्याच्या भीतीने ब्रेंट क्रूडच्या किमतीत ३.३ टक्क्यांनी वाढ होऊन ती १२१.९० डॉलरवर पोहोचली,
तर व्यवहारादरम्यान त्याने १२६ डॉलरचा उच्चांक गाठला. युद्ध सुरू होण्यापूर्वी हे दर केवळ ७० डॉलरच्या आसपास होते.
कच्चे तेल १५० डॉलरपर्यंत
जगाच्या तेल व्यापारापैकी ३० टक्के व्यापार ज्या मार्गावरून होतो, ती ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ इराणने रोखली आहे. अमेरिकेने इराणची नाकेबंदी कडक केल्यास कच्चे तेल १५० डॉलरपर्यंत जाण्याची भीती ‘गोल्डमन सॅक्स’ने व्यक्त केली आहे.
सर्वाधिक फटका भारताला
कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमतींचा सर्वाधिक फटका भारतीय शेअर बाजाराला बसला. गुरुवारी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स ८०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, तर निफ्टीने २३,९०० ची पातळी तोडली. युद्धामुळे भारताला आखाती देशांतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा आलेला नाही. यामुळे देशात तेलाची उपलब्धता कायम होर्मुजमध्ये अडथळे असूनही सौदी अरेबिया आणि यूएईकडून भारताची तेल आयात सुरूच राहिली. सौदी अरेबिया आपल्या १२०० किमी लांबीच्या ईस्ट-वेस्ट पाइपलाइनचा वापर करत आहे, जी तेल लाल समुद्रापर्यंत पोहोचवते. अशाच प्रकारे, यूएईने आपल्या ॲडकॉर्प पाइपलाइनद्वारे तेल ओमानच्या आखातापर्यंत पोहोचवून होर्मुझचा मार्ग बायपास केला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
जागतिक बाजारात वाढलेल्या दरामुळे भारतीय तेल कंपन्यांना आता प्रतिलिटर पेट्रोलवर १४ रुपये आणि डिझेलवर १८ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच मोठी इंधन दरवाढ केली जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते इंधन दरवाढ आता अटळ आहे.