दुचाकीवरून नायलाॅनचे पोते घेऊन निघाले; सापळा लावून पोलिसांनी पकडले, ४ लाखांचा गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 09:32 IST2025-07-08T09:32:08+5:302025-07-08T09:32:08+5:30
अंमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रजमध्ये आंबेगाव परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडले

दुचाकीवरून नायलाॅनचे पोते घेऊन निघाले; सापळा लावून पोलिसांनी पकडले, ४ लाखांचा गांजा जप्त
पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना अमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रजमधील आंबेगाव परिसरात पकडले. त्यांच्याकडून चार लाख २९ हजार रुपयांचा २९ किलो गांजा जप्त करण्यात आला. अक्षय अंकुश माने (३०, रा. घोरपडे पेठ) आणि यश राजेश चिवे (१९, रा. दांडेकर पूल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माने आणि चिवे हे कात्रजमधील आंबेगाव परिसरात गांजा विक्रीसाठी आले होते. अमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते. त्यावेळी दोघेजण दुचाकीवरून नायलाॅनचे पोते घेऊन निघाले होते. रस्त्याच्या कडेला दोघांनी दुचाकी लावली. दोनजण कोणाची तरी वाट पाहत होते. त्यांच्याकडे असलेल्या पोत्यात गांजा असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडील असलेल्या पाेत्याची तपासणी करण्यात आली. पोत्यात २९ किलो गांजा सापडला. गांजा, मोबाईल, दुचाकी असा चार लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
माने आणि चिवे कोणाला गांजा विक्री करणार होते, यादृष्टीने तपास सुरू आहे. अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस कर्मचारी दयानंद तेलंगे, प्रवीण उत्तेकर, विनायक साळवे, सर्जेराव सागर, सचिन माळवे, संदीप शिर्के, विपून गायकवाड, विशाल दळवी यांनी ही कारवाई केली.