Pune Police: दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:05 IST2026-02-02T17:05:04+5:302026-02-02T17:05:42+5:30

भारतात दरवर्षी १ लाख ८० हजार नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, तर सुमारे ७ लाख नागरिक कायमस्वरूपी अपंग होतात

There is no forgiveness for drunk driving; Pune Police Commissioner warns | Pune Police: दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

Pune Police: दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

पुणे : मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या तळीरामांवर यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. सोमवारी (दि. २) पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. या वेळी मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेले एक हजारांहून अधिक वाहनचालक उपस्थित होते.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या खास शैलीत तळीरामांची शाळा घेत, मद्यप्राशनामुळे होणाऱ्या अपघातांची गंभीरता अधोरेखित केली. ‘‘मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अपघात घडतात आणि त्याचे दुष्परिणाम निष्पाप नागरिकांना भोगावे लागतात. यापुढे अशा चालकांवर कठोर कारवाई केली जाईल,’’ असे त्यांनी सांगितले. यावेळी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणात वाहन जप्तीबरोबरच चालकांचा चौकात जाहीर सत्कार, तसेच पोलिसांच्या संकेतस्थळावर त्यांचे फोटो प्रसिद्ध करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. मागील दोन वर्षांच्या तुलनेत २०२५ मध्ये तब्बल ६ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी मार्गदर्शन करताना, ‘‘शिक्षा देणे हा उद्देश नाही, मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे परिणाम गंभीर असतात. येथे उपस्थित नागरिक समाजात ‘मेसेंजर’ म्हणून काम करतील.’’ भारतात दरवर्षी १ लाख ८० हजार नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, तर सुमारे ७ लाख नागरिक कायमस्वरूपी अपंग होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दर आठवड्याला तळीरामांची शाळा

पोलिस मुख्यालय अथवा वाहतूक शाखेच्या कार्यालयात दर आठवड्याला तळीरामांसाठी समुपदेशन शिबिर घेतले जाणार आहे. या शिबिराला उपस्थित राहणे अनिवार्य असेल. रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांची वाहने मनपरिवर्तन होईपर्यंत जप्त ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

‘साहेब, माफ करा चूक झाली…’

मद्यप्राशन करून वाहन चालवलेल्या दोन जणांना पोलिस आयुक्तांनी थेट प्रश्न विचारले. एकाने तातडीचे काम असल्याचे, तर दुसऱ्याने घरगुती कारण दिले. दोघांनीही चूक मान्य करत पुन्हा असे न करण्याची हमी दिली.

४० टक्के अपघात कमी करण्याचा निर्धार...

चालू वर्षात ४० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट पोलिस आयुक्तांनी जाहीर केले. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रणासाठी शहराच्या मध्यवस्तीत बंदी, चालकांची ब्रेथ अनालायझर व शारीरिक क्षमता चाचणी बंधनकारक करण्यात येणार आहे.

लवकरच अत्याधुनिक डिव्हाईस...

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना नवे अत्याधुनिक डिव्हाईस मिळणार असून, कारवाईचा थेट संदेश नियंत्रण कक्षाला जाणार आहे. त्यामुळे कारवाई टाळल्यास संबंधित पोलिसाला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

अजित पवारांचे स्मरण कायम राहील...

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, अजित पवारांचे कार्य कायम स्मरणात राहील. गेल्या आठवड्यात याच ठिकाणी त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला होता. पोलिस दलासाठी त्यांनी दोन वर्षांत ३०० वाहने दिली. आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे काम, नवीन पोलिस ठाणी, मनुष्यबळ यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी पोलिस दलासाठी घेतलेले निर्णय कायम स्मरणात राहतील.

Web Title : पुणे पुलिस की चेतावनी: शराब पीकर गाड़ी चलाने वालों को माफी नहीं!

Web Summary : पुणे पुलिस आयुक्त ने शराब पीकर गाड़ी चलाने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की चेतावनी दी। परामर्श सत्र अनिवार्य हैं। दुर्घटनाओं को 40% तक कम करने पर ध्यान केंद्रित किया गया है। प्रवर्तन के लिए उन्नत उपकरणों का उपयोग किया जाएगा। पुलिस बल के लिए अजित पवार के योगदान को याद किया गया।

Web Title : Pune Police Warns: No Mercy for Drunk Drivers!

Web Summary : Pune Police Commissioner warns strict action against drunk drivers. Counseling sessions are mandatory. Focus is on reducing accidents by 40%. Advanced devices will be used for enforcement. Ajit Pawar's contributions to the police force were remembered.