Leopard Attack: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; गोमातेने उधळून लावला बिबट्याचा खेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:04 IST2025-11-11T17:01:47+5:302025-11-11T17:04:57+5:30
चारा खाण्यासाठी शेतात बांधलेल्या गायींना गोठ्यात आणण्यासाठी गेल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला

Leopard Attack: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; गोमातेने उधळून लावला बिबट्याचा खेळ
मलठण (शिरूर) : टाकळी हाजी येथे बिबट्याने अचानक एक महिलेला हल्ला केला, पण गायीच्या प्रसंगावधान आणि प्रतिहल्ल्यामुळे महिलेचे प्राण वाचले. रंजना गावडे या टाकळी हाजी बंधाऱ्याजवळील गावडे मळ्यात शेतात राहतात. सोमवारी सायंकाळी त्यांनी चारा खाण्यासाठी शेतात बांधलेल्या गायींना गोठ्यात आणण्यासाठी गेल्या, अशा वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या गाईने तत्काळ बिबट्यावर प्रतिहल्ला केला, ज्यामुळे महिलेचे प्राण थोडक्यात वाचले.
या हल्ल्यात त्या बेशुद्ध पडल्या, त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्या धोक्याबाहेर आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी आणि नातेवाइकांनी दिली आहे. शिरुरच्या बेट भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली खूप वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतकाम करण्यासाठी बाहेर जायचे की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मागील महिन्यात २ नोव्हेंबर रोजी रोहन बोंबे, १२ ऑक्टोबर रोजी शिवन्या बोंबे, तर २२ ऑक्टोबरला भागुबाई जाधव यांच्यावर बिबट्याने हल्ला करून तिघांचा बळी घेतला होता. त्यानंतर काही काळ शांतता होती. मात्र, १० नोव्हेंबर रोजी पुन्हा बिबट्याने मानवी हल्ला केला.
घटनास्थळाचा परिसर घनदाट झाडांनी व्यापलेला असून, ऊस शेती आणि घोडनदीजवळ असल्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी पुरेसा आश्रय मिळतो. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन वारंवार होत आहे. घटनेची माहिती मिळताच, वनपाल लहू केसकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास केला. शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले, घटनास्थळी त्वरित पिंजरा लावण्यात येईल आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
या घटनेतून लक्षात येते की महिला असो वा गाय, स्त्रीत्वावर संकट येते, तेव्हा स्त्री रौद्र रूप धारण करून प्रत्येक संकटाला अतिधाडसाने सामोरे जाते. गोमातेने हे सिद्ध करून दाखविले. ‘महागाईच्या या दुनियेत शेतकऱ्यांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?’ असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.