महिलेने आरडाओरडा केला असता तर...! कदमांच्या विधानाचा सर्व थरातून निषेध, त्यांचा त्वरीत राजीनामा घ्या
By राजू इनामदार | Updated: February 27, 2025 20:28 IST2025-02-27T20:27:48+5:302025-02-27T20:28:35+5:30
असंवेदनशील बोलणारे गृहराज्यमंत्री म्हणजे सरकारी मूर्खपणा असून त्यांनी असे वक्तव्य करून समस्त महिलांचा अपमान केला आहे

महिलेने आरडाओरडा केला असता तर...! कदमांच्या विधानाचा सर्व थरातून निषेध, त्यांचा त्वरीत राजीनामा घ्या
पुणे: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बसस्थानकाला गुरूवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी पिडित महिलेने आरडाओरडा केला असता तर बलात्कार झाला नसता असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाचा सर्व थरातून निषेध करण्यात येत आहे.
असे असंवेदनशील बोलणारे गृहराज्यमंत्री म्हणजे सरकारी मूर्खपणा आहे, त्यांचा त्वरीत राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ता सुनील माने यांनी केली. कोणीही राजकीय व्यक्ती अशा घटनांमध्ये बोलताना काळजी घेत असतो. कदम यांनी ते घेतलेली नाही. आरडाओरडा करण्याच्या स्थितीत पिडीत महिला असेल का? असा प्रश्न त्यांना पडला नाही. त्यांची राजकीय समज कमी असल्याचेच त्यांनी दाखवून दिले असे माने म्हणाले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले की अशा वेळी आरोपी कडून चाकू सुऱ्यांची दहशत दाखवण्यात येते. जीवाची भीती घालण्यात येते. कदम यांनी घटनास्थळी बंद पडलेल्या बसमध्ये दारूच्या बाटल्या, साडी, गाज्या सापडल्या त्यावर बोलायचे सोडून असे संवेदनाहिन वक्तव्य केले. पराकाष्ठेचा निर्लज्जपणा त्यांनी दाखवलेला आहे. मुख्यमंत्ऱ्यांनी आपल्या या सहकारी मंत्र्याला मराठी भाषेची शिकवण द्यावी, त्याआधी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शिंदे यांनी केली.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी कदम यांनी असे वक्तव्य करून पिडित महिलेचाच नाही तर समस्त महिलांचा अपमान केला आहे अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला. त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी मोरे व थरकुडे यांनी केली. एसटीचा कारभार सुधारण्यात येईल, स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात येईल असे बोलण्याऐवजी त्यांनी पिडित महिलेने आरडाओरडा केला असता तर असे झाले नसते या प्रकारचे बोलावे हे संतापजनक आहे असे ते म्हणाले.
आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी सरकारमध्येच सभ्यता नाही, तर ती कदम यांच्यामध्ये कुठून येणार असा प्रश्न केला. घटनास्थळी जातानाही या मंत्र्यांना आपला लवाजमा सोडवत नाही, तिथेही त्यांनी गाडी हवी असते, ती थेट घटनास्थळापर्यंत जावी असे त्यांचे म्हणणे असते. जनतेनेच आता यांना धडा शिकवण्याची गरज आहे असे किर्दत म्हणाले.