रील अजूनही हटवली नाही; अखेर सुदामेला ठोठावला ५० हजारांचा दंड, पीएमपीची नोटीस जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 20:10 IST2026-01-07T20:07:46+5:302026-01-07T20:10:28+5:30
दंड जमा न केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे पीएमपीने दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

रील अजूनही हटवली नाही; अखेर सुदामेला ठोठावला ५० हजारांचा दंड, पीएमपीची नोटीस जारी
पुणे: पीएमपीमध्ये विनापरवानगी रिल्स प्रकरणामध्ये इंफ्ल्यूएनसर अथर्व सुदामेला प्रशासनाने तब्बल ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड जमा न केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याची नोटीस प्रशासनाने त्याला पाठवली आहे.
पूर्वपरवानगी न घेता, पीएमपीच्या बसमध्ये रील्स तयार करून, त्यामध्ये महामंडळाचा गणवेश, ई-तिकीट मशिन आणि बॅच बिल्ल्याचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी रील्स स्टार अथर्व सुदामे याला पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नोटीस बजावली होती. अथर्व सुदामे याने पीएमपी बसमध्ये वाहकाचा गणवेश परिधान करून, ई-तिकीट मशिन हातात घेऊन रील्स तयार केले. संबंधित रील्समध्ये एक महिला आणि एक पुरुष असून, महिलांविषयी आशय असल्याचे नमूद करण्यात आले होते. या रील्समुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप प्रशासनाने केला होता. संबंधित रील तत्काळ इन्स्टाग्रामवरून हटवावी, तसेच या प्रकरणी सात दिवसांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्यांकडे लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस त्याला देण्यात आली होती. अन्यथा संबंधिताविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात इशाराही देण्यात आला होता.
अथर्व सुदामेने अजूनही ते रील इंस्टग्रामवरून काढले नाही. तसेच ७ दिवसांमध्ये लेखी खुलासाही प्रशासनाकडे सादर केला नाही. अखेर पीएमपी प्रशासनाने सुदामेला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंड जमा न केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याची नोटीसही त्याला पाठवली आहे.