कामगारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल; १२ तास कामाला भारतीय मजदूर संघाचा तीव्र विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 20:22 IST2025-09-10T20:22:37+5:302025-09-10T20:22:48+5:30
१२ तास काम केल्याने कामगारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल, त्याचे कौटुंबिक जीवन धोक्यात येईल अशी भीती कामगिरी व्यक्त केली

कामगारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल; १२ तास कामाला भारतीय मजदूर संघाचा तीव्र विरोध
पुणे: राज्य सरकारने कामाचे तास १२ करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेने याला तीव्र विरोध केला असून एका शिष्टमंडळाने कामगार मंत्री ॲड. प्रकाश फुंडकर यांना निवेदन देत परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली. याची दखल घेतली नाही तर संघाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा याच निवेदनात देण्यात आला आहे.
संघाच्या प्रदेश शाखेचे अध्यक्ष ॲड. अनिल डुमणे, महामंत्री किरण मिलगीर, संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, वीज उद्योगातील कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात, कोशाध्यक्ष सागर पवार, संघटन सचिव उमेश आणेराव, मुंबई सचिव संदीप कदम, मोहन येणुरे, सुरेश पाटील यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
कामगारांची शरीरक्षमता लक्षात घेऊन ८ तास काम व ४८ तासांचा आठवडा हा कायद्याने संरक्षित केलेला हक्क आहे. आहे त्याच कामगाराला १२ तास काम करणे कायद्याने बंधनकारक केले तर रोजगाराच्या संधी कमी होतील. कामगारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडेल, त्याचे कौटुंबिक जीवन धोक्यात येईल अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली. मंत्री फुंडकर यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले व यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.