राजू इनामदार
पुणे: विधानपरिषद पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. एकूण ५ जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यातील एक जागा पुण्याला मिळावी यासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपचे आमदार व माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यापैकी एकाचे नाव निश्चित होते की पक्षश्रेष्ठी त्याशिवाय आणखी कोणाला संधी देतात याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुळीक यांचा दावा
जगदीश मुळीक माजी आमदार आहेत. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पक्षाने त्यांना नंतर शहराध्यक्ष म्हणून संधी दिली. ते लोकसभेसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना थांबवण्यात आले व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर विधानसभेसाठी भाजपबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली. मुळीक निवडून येत असलेली वडगाव शेरी विधानसभेची जागा युतीमध्ये अजित पवार गटाकडे केली. त्यामुळे पुन्हा एकदा मुळीक यांना शांत बसावे लागले. त्याचवेळी त्यांना थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानपरिषदेचा शब्द दिला गेला असे सांगण्यात येते. त्यामुळेच मुळीक यांना त्यांच्याकडून शब्द पाळला जाईल याची खात्री असल्याचे सांगण्यात येते.
मानकरही आग्रही
दीपक मानकर हे अजित पवार यांचे निकटवर्ती समजले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते लगेचच अजित पवार यांच्याबरोबर बाहेर पडले. पवार यांनी त्यांना शहराध्यक्षपदाची संधी दिली. तेव्हापासून ते पक्षाची पुण्यातील जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना आमदार व्हायचे आहे. यापूर्वी त्यांनी एकदा विधानसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. आता निवडून नाही तर नाही पण विधानपरिषदेची संधी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. समर्थकांसह तेही मोर्चेबांधणी करत आहेत. अजित पवार आपल्याला संधी देतील असे त्यांचे म्हणणे असून त्यांचे समर्थक त्यासाठी पवार यांना भेटून त्यांच्याकडे मागणी करणार आहे.
शहराला मिळतील १० आमदार
पुणे महापालिका हद्दीत विधानसभेच्या आठ जागा आहेत. त्याशिवाय विधानपरिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गो-हे याही आमदार आहेत. आता पुणे शहराला या पोटनिवडणूकीत एक जागा मिळाली तर पुणे महापालिका हद्दीत एकूण १० आमदार होतील. पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार या जागेसाठी आग्रही आहेत. पुणे शहरात आपल्या पक्षाची वाढ व्हावी यासाठी ते जागरूक आहेत. त्यामुळेच ते ही एक जागा युतीमधून खेचून आणतील, फक्त ते उमेदवारी कोणाला देतील याविषयी अद्याप नक्की काहीच नाही. अजित पवार यांच्याकडून नवेच एखादे नाव पुढे आले तर मानकर यांना दोन पावले मागे यावे लागेल असे दिसते.