नव्याने होणारा मार्ग शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक; पुणे-नाशिक रेल्वेमार्ग जुन्या मार्गानेच व्हावा - आढळराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:50 IST2025-12-11T16:50:16+5:302025-12-11T16:50:50+5:30
नव्या मार्गाच्या घोषणेमुळे जुन्नर, खेड, आंबेगाव, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना धक्का बसला असून नव्याने होणारा मार्ग हा जुन्या मार्गावरील तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणार आहे.

नव्याने होणारा मार्ग शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक; पुणे-नाशिक रेल्वेमार्ग जुन्या मार्गानेच व्हावा - आढळराव पाटील
पुणे : पुणे ते नाशिक रेल्वेमार्ग आता पुणतांबा, अहिल्यानगरमार्गे होत आहे. हे जुन्या मार्गावरील शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. हा रेल्वेमार्ग जुन्या मार्गानेच परंतु मंचर-नारायणगावच्या पश्चिम बाजूने व्हावा, अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आढळराव म्हणाले, ‘तत्कालीन खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी १९९५ मध्ये पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण केले. यानंतर पारंपरिक रेल्वेपेक्षा सेमी हायस्पीड रेल्वे करण्याचे ठरले. या काळात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असताना, या प्रकल्पाचे सर्वेक्षण होऊन, अर्थसंकल्पीय तरतूद झाली. हा प्रकल्प पिंक बुकमध्ये आला. त्यानंतर २०१९ मध्ये प्रकल्पाला चालना मिळाली आणि सुमारे ९५० कोटी रुपये भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यानंतर प्रकल्पाचा पाठपुरावा थंडावला. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी लोकसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शिरूर-अहिल्यानगर-शिर्डीमार्गे रेल्वेमार्ग करण्याचे जाहीर केले. या नव्या घोषणेमुळे जुन्नर, खेड, आंबेगाव, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना धक्का बसला. नव्याने होणारा मार्ग हा जुन्या मार्गावरील तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. यामुळे हा मार्ग जुन्या मार्गानेच प्रसंगी जीएमआरटीला बाधा न पोहोचता मंचर नारायणगावच्या पश्चिम भागातून करण्यात यावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.’
नवा मार्ग चार तासांचा असणार
जुना रेल्वेमार्ग अडीचशे किलोमीटर आणि दोन तासांचा असणार आहे. मात्र, नवा मार्ग हा ४०० किलोमीटर आणि चार तासांचा असणार आहे. यामुळे प्रवासी आणि शेतमाल वाहतुकीचा वेळ नव्या मार्गाने वाढणार असेल. या मार्गामुळे वेळेच्या बचतीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारा आहे. यामुळे व्यावहारिक विचार करून, जुन्या मार्गानेच रेल्वेमार्ग व्हावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.