पुण्याच्या इतिहासातील गंभीर दहशतवादी हल्ला; बंटी जहागीरदारच्या हत्येमुळे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या आठवणी पुन्हा ताज्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:09 IST2026-01-02T11:09:49+5:302026-01-02T11:09:57+5:30
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात हल्ल्यात १८ जणांचा मृत्यू झाला आणि ६० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते

पुण्याच्या इतिहासातील गंभीर दहशतवादी हल्ला; बंटी जहागीरदारच्या हत्येमुळे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या आठवणी पुन्हा ताज्या
पुणे: शहरातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदारची बुधवारी (दि.३१) श्रीरामपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दि. १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ०७:१५ वाजेच्या सुमारास शहरातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे जोरदार बॉम्बस्फोट झाला होता. या हल्ल्यात १८ जणांचा मृत्यू झाला आणि ६० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. मृतांमध्ये भारतातील नागरिकांबरोबर परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले होते.
बंटी अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार हा या प्रकरणातील आरोपींपैकी एक आरोपी होता. या बॉम्बस्फोटामध्ये मदत केल्याप्रकरणी एटीएसने त्याला अटक केली होती. आयआरडीएक्ससह तयार केलेल्या आयईडी बॉम्बचा वापर बॉम्बस्फोटावेळी केला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून मिर्झा हिमायत बॅग याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवून मृत्यूची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने काही आरोप रद्द करून शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा दिली होती.
२०१० मधील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट पुण्याच्या इतिहासातील एक गंभीर दहशतवादी हल्ला ठरला. १५ वर्षांनीही त्याचे परिणाम आणि तपास चर्चेत आहे. बुधवारी बंटी जहागीरदार याचा गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासास गती मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.