निर्दयीपणाचा कळस! पान स्टॉल चालवणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचा हत्याराने भोसकून खून; मंचर तालुक्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 14:52 IST2025-04-29T14:51:18+5:302025-04-29T14:52:34+5:30
चार ते पाच वर्षांपूर्वी अपघात झाल्याने उजव्या पायाला मार लागल्याने त्यांना वॉकरला धरून चालावे लागत होते

निर्दयीपणाचा कळस! पान स्टॉल चालवणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचा हत्याराने भोसकून खून; मंचर तालुक्यातील धक्कादायक घटना
मंचर: पान स्टॉल चालवणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचा हत्याराने भोसकून खून केल्याची घटना मंचर येथे घडली आहे. गणेश रवींद्र सोनवणे (वय 28 रा. शितकल वस्ती मंचर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून मंचर पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर शहरातील शितकलवस्ती येथे महात्मा गांधी विद्यालयाच्या जवळ लक्ष्मण किसनराव शेटे यांच्या मोकळ्या जागेत दुकानासाठी जागा भाड्याने दिलेली आहे. या जागेत गणेश सोनवणे याने पुणे नाशिक महामार्गाच्या लगत पश्चिम बाजूस बाबा केदारनाथ पान स्टॉल नावाचे दुकान टाकले होते. सदरची पान टपरी सोनवणे स्वतःचालवत होता. चार ते पाच वर्षांपूर्वी अपघात होऊन सोनवणे यांच्या उजव्या पायाला मार लागल्याने त्यांना वॉकरला धरून चालावे लागत होते. गणेश सोनवणे यांचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. पान टपरीच्या बाजूला असलेल्या काळे रंगाच्या जीप गाडीमध्ये पुढील सीटवर सोनवणे रक्ताबंबळ अवस्थेत आढळून आला आहे. त्याच्या गळ्याला, छातीवर तसेच शरीरावर ठिकठिकाणी हत्याराने भोसकल्याचे दिसून येत आहे. अज्ञात व्यक्तीने सोनवणे याचा खून केला आहे. भाडेकरू संतोष जठार यांनी या घटनेची माहिती लक्ष्मण शेटे यांना दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. गणेश सोनवणे याला रुग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले आहे. पोलिसांनी घटनेतील जीप गाडी ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी लक्ष्मण किसनराव शेटे यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे करत आहेत.