माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:22 IST2025-10-11T19:21:56+5:302025-10-11T19:22:45+5:30
उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आल्यानंतर पाकिस्तानचे ध्वज फडकले, त्यामुळे इम्तियाज जलिल त्यांना साथ देणारच आहेत

माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
पुणे : माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. तर देवेंद्र फडणवीस राज्याचे सर्वांत सक्षम मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आल्यानंतर पाकिस्तानचे ध्वज फडकले. त्यामुळे इम्तियाज जलिल त्यांना साथ देणारच आहेत, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बावनकुळे म्हणाले, प्रकल्प थांबले तरी चालतील पण दिवाळीत शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकतीस हजार पाचशे कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर केले. हा पीक विमा नाही. विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत, ते राजकारण करत आहेत. उद्धव ठाकरेंना अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद समजलेच नाही. ते विधानसभेत केवळ दोनवेळा, मंत्रालयात दोनवेळा आले. माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे आहेत.
घायवळच्या पासपोर्टसाठी कोणी शिफारस केली असे बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, गुंड नीलेश घायवळला शस्त्र परवाना कुणाच्या सरकारने दिला, पासपोर्टची शिफारस करताना गुन्हे नाहीत, असे कोणाच्या सरकारच्या काळात सांगण्यात आले, हे सर्व पोलिस तपासामध्ये समोर येणारच आहे. आता सरकारचे प्राधान्य उच्चस्तरीय चौकशी करून संबंधिताला जेरबंद करणे, हे आहे. राम शिंदे व घायवळ यांच्या संबंधाबद्दल शिंदे यांनाच विचारावे लागेल, असे म्हणत बावनकुळे यांनी जोपर्यंत न्यायालय शिक्षा देत नाही, तोवर गुन्हेगार कसे समजायचे, असे उत्तर दिले.
परवानाधारक खासगी भूमापकांकडून मोजणी
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी-विक्री होते, तुकडे पडत आहेत. दररोज मोजणीचे २५-३० प्रस्ताव येतात. खरेदीखत करण्यापूर्वी मोजणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर राज्यांनुसार परवानाधारक खासगी भूमापकांकडून मोजणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मोजणीचा अर्ज आल्यानंतर ३० दिवसांत मोजणी, नंतर खरेदीखत व फेरफार करता येईल. मोजणी केल्यानंतर आमचे अधिकारी तपासणी करून मंजुरी देतील. यातून राज्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच पुरंदर विमानतळाच्या ९० टक्के जागेचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन होईल. विमानतळाच्या प्रभावी क्षेत्रात कोठेही घरे व उंच इमारती होणार नाहीत. जागेची खरेदी-विक्री होणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.